Wednesday, 6 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर, १९४५ मध्ये जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हे जग विनाशकारी शस्त्रांपासून मुक्त झालं पाहिजे, तसंच अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी, जागतिक शांतता आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत आज माजी राज्यपाल, आणि सभागृहाचे माजी सदस्य सत्यपाल मलिक यांनी श्रद्धांकली वाहण्यात आली. मलिक यांचं काल दिल्लीत निधन झालं. त्यानंतर कामकाज सुरु करताना उपसभापती हरिवंश यांनी, विरोधकांचे विविध विषयांवरचे ३५ स्थगन प्रस्ताव फेटाळून लावले. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. शून्यकाळात अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित होत असतात, त्यामुळे कामकाज चालू देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर साडे पाच टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. बॅंकेच्या मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाई कमी झाली असून, चांगल्या मान्सूनमुळे खरीप पिकांचं उत्पादनही चांगलं होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल उत्तम राहण्याचा अंदाज व्यक्त करत, एकूण देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी वाढीचा दर साडे सहा टक्के राहण्याचा अंदाजही मल्होत्रा यांनी वर्तवला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलं. प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून, त्यापैकी कर्तव्य भवन ही पहिली इमारत आहे. यामध्ये विविध मंत्रालयं आणि विभाग एकाच ठिकाणी आणण्यात आली आहेत.

****

दरम्यान, नवी दिल्लीत उद्या एम एस स्वामीनाथन जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वामीनाथन यांच्या गौरवार्थ काढलेल्या नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. एम एल जाट यांनी दिली.

****

उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे ११ जवान बेपत्ता झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वैजापूर तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगाव शनी इथं आज योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून जनता दरबार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या गरजू नागरिकांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या समस्या आणि तक्रारी थेट मांडता येणार आहेत.

****

राष्ट्रीय अवयवदान दिनाचं औचित्य साधत नंदुरबार इथं आज जनजागृती रॅली काढण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजय राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी या रॅलीत सहभाग घेत अवयवदाना विषयी पोस्टर झळकवत आणि घोषणात देत जनजागृती केली.

****

हिंगोली रेल्वे स्थानकार गेल्या काही महिन्यांपासून उभ्या असलेल्या तीन रेल्वे बोगीपैकी एका बोगीला आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

****

धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातही अनेक दिवसांच्या खंडानंतर आज सकाळी जोरदार पाऊस झाला.

****

No comments: