Thursday, 7 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात गेल्या शतकातल्या शास्त्रज्ञांनी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली; आता पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. २१ व्या शतकातला भारत सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर केलं होतं, मात्र आज केवळ अन्नधान्य नव्हे, तर पोषणयुक्त आहार सुरक्षेचीही तितकीच गरज आहे जेणेकरून प्रत्येक भारतीयाला पुरेसं अन्न आणि आवश्यक पोषण दोन्ही मिळू शकेल, असं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"विज्ञान म्हणजे केवळ शोध नव्हे, तर पोहोचवणंही आहे," हे स्वामीनाथन यांचं वक्तव्य त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं. ते केवळ संशोधक नव्हते, तर शेतकऱ्यांना नवे शेती तंत्र स्वीकारण्यासाठी प्रेरित करणारे मार्गदर्शक होतेही, असं पंतप्रधान म्हणाले. सदा हरित क्रांती, जैव आनंदाचा मार्ग असा या संमेलनाचा विषय आहे.

****

विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली. या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे.

****

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. गंगोत्री आणि आसपासच्या परिसरातून २७४ पर्यटकांना उत्तरकाशी किंवा देहरादून इथं सुरक्षित पाठवण्यात आलं असून, यात महाराष्ट्रातल्या १२३ जणांचा समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी इथल्या पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिर आणि परिसराच्या विकास कामांचा आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. मंदिर आणि परिसराचा विकास करताना पौराणिक महत्त्व अबाधित राखून अभूतपूर्व विकास कार्य करण्यात यावं, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. हा आराखडा आता २८६ कोटींवरून ३५१ कोटींचा करण्यासही पवार यांनी मान्यता दिली. याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.

दरम्यान, पवार यांनी आज बीड शहरातल्या चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, इथं सुरू असलेल्या आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांची पाहणी केली.

****

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर राज्य गीत आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन याच्या अंमलबजावणीची तपासणी करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. काल गोंदिया इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

****

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील काटली गावाजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करुन या मार्गावरची वाहतूक बंद पाडली. जखमी विद्यार्थ्याना नागपूर इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली आहे.

****

स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन सोहळा येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथं साजरा होणार आहे. परिवाराच्या प्रमुख धनश्री दिदी तळवळकर यांच्या उपस्थितीत वाळुज इथं हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी स्वाध्यायी दुचाकी फेरी काढण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

****

No comments: