Thursday, 7 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

भारत कधीही त्यांच्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. "विज्ञान म्हणजे केवळ शोध नव्हे, तर पोहोचवणंही आहे," हे स्वामीनाथन यांचं वक्तव्य त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं. ते केवळ संशोधक नव्हते, तर शेतकऱ्यांना नवे शेती तंत्र स्वीकारण्यासाठी प्रेरित करणारे मार्गदर्शक होते, असं पंतप्रधान म्हणाले.

सदा हरित क्रांती, जैव आनंदाचा मार्ग असा या संमेलनाचा विषय आहे.

****

राष्ट्रीय हातमाग दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश, देशातले गतिमान हातमाग क्षेत्र आणि त्याचे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील आणि सांस्कृतिक ओळख मिळवून देण्यासाठी योगदानाचा सन्मान करणं हा आहे. देशभरातून साडेसहाशे विणकरांसह परदेशी खरेदीदार, निर्यातदार यात सहभागी होतील. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार तसंच राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरणही होणार आहे.

****

केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारतजेन या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रमात पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सर्व २२ भाषांचा समावेश केला जाईल, अशी माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल लोकसभेत दिली. सध्या भारतजेनमध्ये नऊ भारतीय भाषा समाविष्ट आहेत. यात मराठी, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, गुजराती, तेलुगू आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. येत्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत यात आसामी, मैथिली, ओडिया, संस्कृत, सिंधी आणि इतर भाषांचा समावेश होईल, अशी माहिती सिंह यांनी दिली.

****

बीड शहरात सुरू असलेली विविध विकास कामं करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार काम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी आज बीड शहरातल्या चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, इथं सुरू असलेल्या आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

****

अल्पसंख्याक समुदायातल्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातला सहभाग वाढवण्यासाठी तसंच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. अल्पसंख्याक आणि औकाफ विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं. सध्या राज्यात २६ ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे कार्यरत असून, तीन ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोकाटे यांनी काल क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचाही कार्यभार स्वीकारला.

****

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये केलेल्या कामाचं अनुदान केंद्र सरकारने तातडीने जारी करण्याची मागणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे  केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्रातल्या योजनांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित असलेल्या देयकांचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय अनुदानाची तातडीने गरज आहे, याबाबत पाटील यांनी यासंदर्भात झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवून लवकरात लवकर निधी देण्याचं आश्वासन दिलं.

****

राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहं उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी ही वसतिगृहं उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनानं एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. मुंबईत चेंबूरमध्ये शासकीय वसतिगृहाच्या नूतन इमारतींच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.

****

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत अकोला तालुक्यातल्या उगवा इथं विशेष महसूल सेवा शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना महसूल विषयक सेवा, सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, पशुवैद्यकीय योजना, वीज वितरण तक्रारी निवारण, ई-केवायसी, रास्त भाव दुकान सेवा आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

****

पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा ६२ पूर्णांक ५९ मीटर अंतरावर भाला फेकला. या विजयामुळे अनू राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडुंमध्ये स्थान मिळालं आहे. इतर स्पर्धांमध्ये भारताच्या पूजा हिनं ८०० मीटर महिलांच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं.

****

No comments: