Sunday, 17 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

·      राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, नद्यांची पाणीपातळी वाढली, उद्यापर्य़ंत मराठवाडा आणि कोकणातल्या १० जिल्ह्यांना रेड अलर्ट

·      केंद्रीय निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीनं काम करत असून मतचोरीचे आरोप खोटे असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन

·      महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आणि

·      TAIT, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे.

****

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचं सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज सकाळी धरणाचे आठ दरवाजे एक फूट उघडून सात हजार घनफूट प्रति सेकंद, तसंच इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडून ५४ हजार ४६६ घनफूट प्रति सेकंद वेगानं विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने रविवारी सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील एकूण १८ दरवाजापैकी सध्या ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केलं आहे.

 

वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अडाण नदीला पूर आल्यानं शेलूबाजार इथं नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. प्रशासनानं तातडीनं रात्रीच रहिवाशांना स्थानिक शाळेत हलविलं. मालेगाव तालुक्यात जौळका इथं काटेपूर्णा नदीवर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक वाशीम मार्गे वळवण्यात आली.

 

रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठ परिसरात पाणी शिरलं आहे. नारिंगी, कुडावळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दापोली-मंडणगड रस्त्यावरची वाहतूक बंद झाली. तर, माखजन इथंही बाजारपेठेत पाणी शिरलं.

 

परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने ओढे नाले आणि नद्यांना पूर आला आहे.तर अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी जाऊन खरिपाच्या पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे,पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि गोदावरी, पूर्णा, दुधना नदीत विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच पशूधनही सुरक्षित ठिकाणी बांधावे, असं आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी नागरिकांना केलं आहे.

बाईट - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

****

बीड शहरात पोलिस दलानं आयोजित केलेली ‘नशामुक्त बीड दौड २०२५’ मॅरेथॉन स्पर्धा आज संपन्न झाली. पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत पोलिस कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. 

****

केंद्रीय निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीनं काम करत असून मतचोरीचे आरोप खोटे आहेत, काही जण दिशाभूल करत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतचोरीचा आरोप करणं हा संविधानाचा अपमान नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत. गेल्या वीस वर्षांपासून जवळपास सगळेच राजकीय पक्ष मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मागणी करत आहेत. ती पूर्ण करण्यासाठीच विशेष पुनरिक्षणाची सुरुवात बिहारमधून केली आहे. प्रारुप मतदार यादी तयार केली असून त्याची पडताळणी सर्व राजकीय पक्षांच्या बूथ एजंट्सनी केली आहे. मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी अद्याप १५ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावरचे राजकीय पक्ष, बूथ एजंट आणि मतदारांना या त्रुटींवरच्या सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असं आवाहन ज्ञानेश कुमार यांनी केलं.

****

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्द्ल तीव्र आक्षेप घेतले आहेत. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती.

****

TAIT, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा २०२५ चा निकाल उद्या प्रसिद्ध करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेसाठी एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारानी परीक्षा दिली. त्यातल्या बी.एड. आणि डी.एल.एड. परीक्षेला प्रविष्ट असलेल्या १० हजार ७७९ उमेदवारांनी, विहित मुदतीत, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे. त्यांचाही निकाल प्रसिद्ध केला जाईल. मात्र ज्यांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही, अशा ६ हजार ३१९ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला जाईल, असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

****

गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधांसाठीचा निधी सहा टक्क्यानी वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजधानी दिल्लीत ११ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-२ यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

****

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पहाटे मायदेशी परतले.  दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही नारायणन यांनी त्यांचं स्वागत केलं. शुक्ला यांचे कुटुंबियही यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. नासाच्या एक्झिओम ४ मोहिमेवरून परतल्यानंतर त्यांचं शरीर पृथ्वीवरच्या वातावरणाला पुन्हा सरावण्याच्या अनुषंगानं अमेरिकेत काही दिवस पुनर्वसन शिबिरात राहून ते आता भारतात परतले आहेत.

****

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पीजी परीक्षेचा निकाल येत्या ३ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी मंडळाने गेल्या ३ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती. अडीच लाखाहून जास्त विद्यार्थी बसले होते. nbe.edu.in  आणि natboard.edu.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील.

****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंती निमित्त धाराशिव इथं आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपटाचं सादरीकरण केलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चांगदेव उपदेश तसेच रेड्याच्या मुखी वेद वदवणे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी हे प्रसंग यावेळी विद्यार्थ्यांनी  सादर केले.

****

हैद्राबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. मराठवाड्यातील हुतात्म्यांनी जो लढा दिला तो विसरता येणार नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं मत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव इथं ,भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या प्रवीण सरदेशमुख लिखित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी प्रवीण सरदेशमुख,जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

****

राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तलवारीचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत या तलवारीचं लोकार्पण होईल. त्यानंतर या तलवारीसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या १२ गडांच्या माहितीचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान, सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सर्वांना विनामूल्य पाहता येईल.

****

हवामान

राज्यात येत्या २१ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अधूनमधून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उद्यापर्य़ंत मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. येत्या २० तारखेपर्यंत कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

****

No comments: