Tuesday, 19 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यातल्या बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग

·      छत्रपती संभाजीनगर विभागात ५७ मंडळात अतिवृष्टी; ८०० गावांना फटका; नांदेड जिल्ह्यात पावसाचे पाच बळी

·      मराठवाड्यात धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट, सावधगिरी बाळगण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन

·      अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आणि

·      तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात सरकार कसलीही तडजोड स्वीकारणार नाही, मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन

****

राज्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात काल ३२ पूर्णांक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विभागातल्या ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे विभागातली एकूण एक हजार चार गावं बाधित झाली आहेत. पावसाशी निगडीत विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०५ जनावरं दगावली आहेत. मराठवाड्यात आज धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने सावध राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात पुरात अडकलेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पुराचे पाच बळी गेले आहेत. मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे लेंडी नदीला पूर आला शेती, मालमत्ता, पशुधन यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...

बाईट-अनुराग पोवळे,नांदेड

****

बीड जिल्ह्यातल्या १६ महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. परळी वैद्यनाथ तालुक्यातल्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून, नद्यांना पूर आला आहे. कौडगाव हुडा इथल्या तरुणांची कार गाव नदीच्या पुरात वाहून गेली. यापैकी तिघांना वाचवण्यात आलं असून, एकाचा मृतदेह सापडला. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आले असून, प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास नागरीकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावं, असं आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, पिकांमध्ये पाणी साचलं आहे. घाणेवाडी इथलं संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेने भरलं असून, शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील राजाटाकळी, जोगलादेवी आणि मंगरुळ उपसा बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानं तिनही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाच्या आठ दरवाजातून पूर्णा नदी पात्रात ६४ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या ठिकाणी पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढल्याने सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी, येलदरी धरण प्रशासनाने, परभणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या ईसापूर आणि सिद्धेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

 

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या धडकनाळ आणि बोरगाव गावात लेंडी नदीच्या उपनदीला आलेल्या पुराने शेतीचं तसंच मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक जनावरे, शेळ्या वाहून गेल्या, तर ७० घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. जिल्ह्यात १७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. मांजरा धरणाचे सहा, तर निम्न तेरणा प्रकल्पाचे सहा दरवाजे काल उघडण्यात आले. सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातले १३ लघु सिंचन प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा नदी काठच्या गावात पुढील काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. पावसामुळे वीजतारा, पोलसह रोहित्रे कोसळून उदगीर तालुक्यातल्या काही गावांचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडीत झाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कन्नड परिसरातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाच दरवाजातून एक हजार ८५७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

****

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतीचं, तसंच घरांचं, रस्त्यांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, शासन आपल्या पाठिशी असल्याचं, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याची, तसंच २४ तास तक्रारी स्विकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारण्याची मागणी छत्रपती संभाजीनगचे खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

****

श्रीमंत सेना साहिब सुभा राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लोकार्पण सोहळा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील, असंही त्यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर इथंवारसा सह्याद्रीचाया सांस्कृतिक कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं. एम.आय.टी. महाविद्यालयात झालेल्या उद्घाटन सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित होते. विविध राज्यात हजारो वर्षांपासून चालत आलेली लोकसंस्कृती विविध लोक महोत्सवांमुळे आजही जिवंत आहे, या लोककलाकारांनी कलाविष्कारातून लोकसंस्कृतीचा वारसा जपला असल्याचं बागडे यावेळी म्हणाले.

राजस्थानचं खरताल, महाराष्ट्राची तुतारी, लावणी, गोंधळ, गुजरातच्या सिद्दी धमाल, बंगालच्या नटुआ, तर राजस्थानच्या चरी लोकनृत्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होईल.

****

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही, असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामं केली जातील, असं ते म्हणाले.

****

नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदने जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टलसेवा विकसित केली आहे. या पोर्टलचा शुभारंभ काल पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत २०२३-२४ या वर्षाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरीत करण्यात आले. भोकर तालुक्यातल्या नागापूर ग्रामपंचायतीने पहिला, हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव ग्रामपंचायतीनं दुसरा, तर कंधार तालुक्यातल्या चिंचोली ग्रामपंचायतीनं तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शिराढोण इथं जिल्हा परिषद शाळा तसंच पोलीस ठाण्याच्या वतीने काल ध्वनी प्रदूषण जन जागृती रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला DJ नको, आवाज कमी ठेवा, अशा जनजागृतीपर घोषणा देवून ध्वनी प्रदूषण न करण्याचं आवाहन केलं.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 19 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...