Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी
स्थगित झालं. या अधिवेशन काळात लोकसभेत १४ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली, तर १२ विधेयकं पारित झाली. सदनात ऑपरेशन
सिंदूरवर, तसंच भारताच्या अंतराळ कार्यक्रमावर विशेष चर्चा झाल्याचं
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. कामकाजात सततच्या व्यत्ययामुळे या अधिवेशन काळात
लोकसभेत केवळ ३७ तासच काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. सदनात मर्यादा
आणि परंपरेनुसार चर्चा झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी
आत्मपरिक्षण करण्याचा अध्यक्षांनी सल्ला दिला. ते म्हणाले –
बाईट - ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा
दरम्यान, बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या
मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं. राज्यसभेत आज १३०वं घटना दुरुस्ती विधेयक, केंद्रशासित
प्रदेश सरकार विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक सादर होण्याची अपेक्षा
आहे. काल लोकसभेनं हे तिनही विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
भाजपने राज्यसभेत सादर होणाऱ्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी खासदारांना सदनात उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे.
****
उपराष्ट्रपतीपदाचे इंडिया या विरोधी
आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल
केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी,
खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यासह आघाडीतल्या इतर पक्षांचे
सदस्य यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या नऊ सप्टेंबरला होणार
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव
चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंत अधिकारी-कर्मचारी तसंच आदर्श ग्रामविकास अधिकारी
आणि ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा काल पार पडला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यावेळी
उपस्थित होते. प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्य तत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं, पापळकर यावेळी म्हणाले.
****
संयम, संपर्क, समन्वयाने
गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
केलं आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. बीड इथंही गणेशोत्सव शांतता समितीची
बैठक काल झाली. नागरिकांनी कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता
सलोखा अबाधित ठेवत हे सण आनंदाने आणि शांततेत साजरे करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी केलं.
****
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर
बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा शहरात पोलिसांनी ४१ तलवारी जप्त करुन, एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या वतीने जिल्ह्यात संवेदनशील शहरात तसंच
शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने मोहीम राबवण्यात येत आहे. हा शस्त्रसाठा नांदुरा
शहरात कशासाठी आणण्यात आला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ओबीसी महामंडळाच्या
थकबाकीदार कर्जदारांनी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेण्याचं अवाहन महामंडळानं केलं आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यातल्या इतर
मागास प्रवर्गातल्या गरजू लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध
करून दिलं जातं. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहील.
****
राज्यात अनेक भागात पावसाचं प्रमाण
कमी झालं आहे, मात्र
तरीही प्रकल्पांमधला पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणात १५ हजार ६४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा
९५ टक्क्यांवर गेला आहे. सध्या धरणाच्या १८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नागरिकांनी नदीच्या काठावर जाऊ नये, आपली जनावरे गोदापत्रात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं जायकवाडी पाटबंधारे विभागानं आवाहन केलं आहे.
****
जळगावच्या हतनूर धरणातून तापी नदीपात्रात
होत असलेल्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे
उघडण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने तापी
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment