Friday, 22 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भटक्या कुत्र्यांसंबंधी धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश

·      भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      शेतकऱ्यांसाठी किसान कॉल सेंटरसुरू करण्याची राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

आणि

·      बैलपोळा सर्वत्र उत्साहाने साजरा

****

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांसंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अशा प्रकरणांशी संबंधित ज्या याचिका देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असतील, त्या सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र - दिल्ली एनसीआर परिसरातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं निर्बिजिकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या भागात सोडण्याचे आदेश दिले. भटक्या कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात पाठवण्याचा आधीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. रेबिजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात ठेवलं जाईल, या निर्णयामुळे जानवरांचं कल्याण आणि सार्वजनिक सुरक्षेचं संतुलन राखण्यास मदत होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे. सत्तेबाहेर जावे लागेल या भितीनं सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहार राज्यात गया इथं आज एका जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलं.

****

राज्य सरकार सुमारे १ हजार ८०० भजनी मंडळांना भजन साहित्याच्या खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान देणार आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मदत दिली जाणार आहे. यासाठी उद्यापासून ०६ सप्टेंबर पर्यंत mahaanudan.org या वेबसाइटवर अर्ज करावे लागतील.

****

सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंग समानतेतून जातो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग तसंच राज्य महिला आयोगाच्या शक्तिसंवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. या उद्घाटन सोहळ्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, या संवादातून निर्धारित होणारी कार्ययोजना राज्यात राबवण्याबाबत आश्वस्त केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावं यासाठी 'किसान कॉल सेंटर' सुरू करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ते आज पुण्यात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. संकट काळात शेतकऱ्याला त्वरित सल्ला आणि मदतीची गरज असते, त्यासाठी समर्पित कॉल सेंटर आवश्यक असल्याकडे भरणे यांनी लक्ष वेधलं. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश भरणे यांनी या बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जाईल, मात्र हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा भरणे यांनी दिला.

****

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना क्लीनरची गरज नाही अशी अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे.मालवाहतूकदारांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार ही अधिसूचना सरकारनं जारी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यानं क्लिनरची गरज नाही. परिणामी खर्च कमी होईल, असा वाहतूकदारांचा दावा आहे. यावर परिवहन आयुक्त कार्यालयात २९ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील.

****

बैलपोळ्याचा सण आज सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. काल खांदेमळणी केलेल्या बैलांना आज सजवून त्यांची मिरवणूक काढून पूजा केली जाते. तसंच त्यांना पुरणपोळीचा घास भरवला जातो.

परभणी जिल्ह्यात गावा गावातून वाजत गाजत मिरवणूका काढण्यात आल्या, कातनेश्वर इथं मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात पारंपारिक पध्दतीने गोरेगाव इथं कावरखे आणि खिल्लारी हनुमान मंदिर इथं बैलपोळा भरवत विवाह विधीने पोळा साजरा करण्यात आला. वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे दरवर्षी पोळ्याचा कर निमित्त महापोळा भरण्याची ऐतिहासिक परंपरा कायम असून, उद्या २३ गस्ट रोजी महापोळा भरणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर इथंही हरसुल तसंच मुकुंदवाडी भागात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

नागपूर इथं तान्हा पोळा निमित्त १४४ वर्षांची परंपरा असलेली काळी आणि पिवळी मारबत बडगा मिरवणूक काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या शास्ती से आजादी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. थकीत मालमत्ताकर तसंच थकीत पाणीपट्टीवरच्या दंडात सूट देणाऱ्या या योजनेला मुदतवाढ दिल्याचं, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन जी श्रीकांत यांनी केलं आहे

बाईट - जी श्रीकांत, मनपा आयुक्त तथा प्रशासक

****

छत्रपती संभाजीनगरातल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रात अर्थात ऑरिक सिटीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड देण्यात आले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका पत्रकात ही माहिती दिली आहे. या कंपन्यांमध्ये खाद्यान्न, कागद, इलेक्ट्रॉनिक्स, रस्ते बांधणी उपकरणे, इत्यादी उद्योगांचा समावेश आहे. यामध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे १ हजार रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज मुक्रमाबाद या गावाला भेट देऊन पाहणी केली. पुरात पाच जणांचा मृत्यू झाला असून परिसरातील दुभती जनावरे वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

दरम्यान, जिल्ह्यात पुरामुळे ५९ गावांमध्ये पशुधनाची हानी झाली आहे. जवळपास ७६ मोठी जनावरे, ५६ शेळ्या, ८२ कोंबड्या दगावल्या आहेत. या पशुधनाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असल्याचं पशुसंवर्धन विभागतर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पूर प्रभावित क्षेत्रात पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त राजकुमार पडिले यांनी केलं आहे.

****

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेंतर्गत बीड तालुक्यात १४ हजार २४५ लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यात आले आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताह घेण्यात आला.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर अभियान राबवण्याचं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेतल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी कार्यालयीन परिसरात राबवलेल्या प्लास्टिक बंदी उपक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा करत हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्याची सूचना केली. गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन इथल्या शनिमंदिराच्या चारी बाजुंनी पाणी आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन च्या वतीने खासगी साखर उद्योगातल्या  उल्लेखनीय कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्यात साईनगर रांजणी इथल्या नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याला ‘राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना’ हा पुरस्कार देण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन कारखान्याला गौरवण्यात आलं.

****

नाशिक महानगरपालिका तसंच गोदावरी इनिशिएटीव्ह स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातल्या १२० शाळांमधल्या  विद्यार्थ्यांनी काल १६ हजारांहून अधिक शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याचा अनोखा विक्रम केला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

****

No comments: