Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 23
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत
९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि २६ दश लक्ष लिटर क्षमतेच्या फारोळा इथल्या जलशुद्धीकरण
केंद्राचं त्यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. यानंतर ते या कामाची पाहणी करुन आढावा
घेणार आहेत.
***
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी अवकाश क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ, सदस्य आणि तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत लवकरच गगनयान
मोहीम सुरू करणार असून आगामी काळात भारत स्वतःचे अंतराळ स्थानक बांधेल असे पंतप्रधानांनी
एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. अवकाश तंत्रज्ञान भारतातील प्रशासनाचा अविभाज्य भाग
बनत असून या क्षेत्रातील प्रगती सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करत असल्याचंही पंतप्रधानांनी
सांगितलं.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ आणि ३० तारखेला १५ व्या
भारत जपान वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
हा पंतप्रधान मोदी यांचा आठवा जपान दौरा असेल या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान शिगेरु इशिबा
यांच्याशी सुरक्षा, व्यापार, अर्थव्यवस्था, प्रौद्योगिकी आणि विशेष रणनीती तथा जागतिक भागीदारीवर चर्चा करतील.
यानंतर ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर जातील.
***
भारतात टिकटॉकवरील बंदी उठवण्याबाबत कोणताही आदेश जारी
करण्यात आलेला नाही, असे सरकारने स्पष्ट
केले आहे. भारतात टिकटॉकवरील बंदी उठवल्याचा दावा करणारे कोणतेही विधान किंवा बातम्या
खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सूत्रांनी
काल सांगितले.
***
अमेरिका-भारत यांच्यातील संबंध व्यापार धोरणावरुन तणावपूर्ण
असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल
पर्सनल ऑफिसचे सध्याचे संचालक सर्जियो गोर यांना भारताचे राजदूत म्हणून घोषित केलं
आहे. सर्जियो गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणूनही नियुक्त करण्यात
आलं आहे. भारतावर लादण्यात आलेल्या मोठ्या शुल्कादरम्यान ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला
आहे. 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे मिशन गौर पुढे नेतील असा विश्वास ट्र्म्प यांनी व्यक्त
केला.
***
नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास
संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रोफेसर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी
त्रिपाठी या दोघांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला.आज कुशीनगर जनपद मऊ या ठिकाणी
जात असताना पहाटे ही दुर्घटना घडली.
***
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १६ पंचायत
समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
संबंधित कार्यालयं तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली
आहे.
***
नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी
उपलब्ध व्हावी, यासाठी किनवट इथं परवा २५ तारखेला
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्यात नामांकित उद्योजक, शाळा, महाविद्यालय तसंच इतर आस्थापनांच्या
वतीने मुलाखती घेण्यात येतील. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसंच माहितीसाठी ०२४ ६२- २५ १६ ७४ आणि ९८ ६० ७२ ५४ ४८
या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
***
गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक जिल्हा
परिषदेच्या गट आणि गणांची पुनर्रचना अंतिम झाली आहे. काल रात्री नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी
ही अंतिम रचना जाहीर केली. नव्या गट रचनेनुसार २०१७ मध्ये असलेल्या ७३ गटांच्या संख्येत
आता एक गटाने वाढ झाली असून एकूण ७४ गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढून ही संख्या
१४६ वरून १४८ इतकी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये निफाड आणि ओझरचा प्रत्येकी
एक-एक गट कमी झाला आहे. या निवडणुकीसाठी अनुसूचीत जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षणासाठी चक्राकार पद्धतीने
आरक्षण केले जाणार आहे.
***
बल्गेरियामध्ये झालेल्या जागतिक २० वर्षांखालील कुस्ती
स्पर्धेत, आज तरुण महिला कुस्तीगीर काजलने
सुवर्णपदक जिंकले तर श्रुती आणि सारिका यांनी कांस्यपदक जिंकले. काजलने ७२ किलो वजनी
गटात चीनच्या वरिष्ठ आशियाई पदक विजेत्या युकी लिऊवर आठ विरुद्ध सहा असा रोमांचक विजय
मिळवत इतिहास रचला. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सारिकाने तर श्रुतीने ५० किलो वजनी गटात कांस्यपदक
जिंकले. पुरुषांच्या ग्रीको-रोमन ६० किलो वजनी गटात, सूरजने कांस्यपदक जिंकले. आतापर्यंत, भारतीय कुस्तीगीरांनी दोन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत.
***
No comments:
Post a Comment