Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं
जलपूजन
·
भारताचं
गगनयान अंतराळात लवकच झेपावेल, पंतप्रधानांचा विश्वास
·
देशाच्या
आणि राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वाचा, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
स्टेट
बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे
आणि
·
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या विविध ग्रंथपुरस्कारांचं उद्या वितरण
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं
आज दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे. छत्रपती
संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि
२६ दश लक्ष लिटर क्षमतेचं हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलपूजनानंतर मुख्यमंत्री पाणीपुरवठा
योजनेचा समग्र आढावा घेणार आहेत.
****
गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान,
भारत वेगानं विकसित करत असून लवकरच
गगनयान अंतराळात झेपावेल, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी आज देशाला संबोधित
केलं. गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी
गौरवपूर्ण उल्लेख केला, ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
****
चांद्रयान २ मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या
आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे
नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं. स्पर्धेत मिळालेल्या यशावर
न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं,
ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी
होणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लानेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित
होण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे नकाशे आणि इतर माहिती आयआयटी मुंबईच्या वेबसाइटवर
चांद्रयान नावानं उपलब्ध आहे.
****
सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि
रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले. स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे
२ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले. १३ जून रोजी स्टेट बँकेनं
रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज ‘फसवणूक’ या
श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे. १७ हजार
कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय
आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या,
तसंच त्यांची चौकशी केली होती.
****
राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात
पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या
आहेत, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य
नसल्याचे सांगून महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना
राबविल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
राज्यातल्या विविध भागांतून मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज मुंबईत दादर येथे पार
पडला. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांची याप्रसंगी उपस्थिती
होती.
****
राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल
अडीच लाख पदं रिक्त असूनही नोकर भरती केली जात नाही. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात
आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व
तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक व प्रदेश
सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी ही माहिती दिली. युवकांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी
रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवरी सकाळी क्रांती चौक
इथून रोजगार सत्याग्रह यात्रेला प्रारंभ होऊन महावितरणचे सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय,
मिल कॉर्नर इथं पोहोचेल. तिथं निवेदन
सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचं
काँग्रेसनं म्हटलं आहे.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या
विषयावरील कृषि विभागानं आयोजीत केलेला शेतकरी परिसंवाद शेतकऱ्याच्या ज्ञानात भर घालणारा
ठरेल, असं
प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी केलं. सांगली जिल्ह्यात
पेठ नाका इथं आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रम आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पादन, उत्पन्न वाढावं, शेतमालास चांगला भाव मिळावा, यासाठी ठिबक सिंचन, शेती तसंच शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचं शासनाचं
धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून
घोषित करण्यात आलं आहे. त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी
विविध उपक्रम, कार्यक्रम,
उत्सव आणि स्पर्धांचं आयोजन केलं आहे.
याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे
दर्शन मिळावे, यासाठी
गणेशोत्सव डॉट पीएलडीएमकेए डॉट को डॉट इन या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सांस्कृतिक
कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज ही माहिती दिली. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची
योजना असून १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपये यानुसार भांडवली अनुदान वितरित
करण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान अधिकृत संकेतस्थळावर
उपलब्ध असल्याची माहिती आशिष शेलार यांनी यावेळी दिली.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने
प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथपुरस्काराचे वितरण उद्या,
रविवारी माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभात नरहर कुरूंदकर वाङ्मयपुरस्कार
अनोखे थायलंड प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना,
म. भि. चिटणीस वाङ्मयपुरस्कार गांधी
: वाद आणि वास्तवसाठी सचिन कुसनाळे यांना, बी. रघुनाथ वाङ्मयपुरस्कार- पांडुरंग मुरारी यांच्या नांगरमुठी
या साहित्यकृतीला आणि पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी रा. ज. देशमुख स्मृतीपुरस्कार कैलाश पब्लिकेशन्स,
छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात येणार
आहेत.
****
भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा
योग्य वापर करून तसंच पशुपालनासह मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा
होईल. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आव्हानांचा विचार करता कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण
होणं अत्यावश्यक आहे, असं
प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलं. छत्रपती
संभाजीनगर इथं तापडिया नाट्य मंदिरात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त
घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पशुवैद्यक शास्त्रात सर्वोच्च गुण प्राप्त
करणारे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही
यावेळी गौरवण्यात आलं. तसंच ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचं प्रकाशनही
यावेळी झालं.
****
नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत
विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे
रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला. प्राध्यापक
हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. अनेक
विषयांवर संशोधन करताना त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहिली होती. राज्यपाल आणि कुलपती
सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या
वतीनं उद्या, रविवारी
सकाळी साडे सहा वाजता १० किलोमीटर सायकलेथॉन २०२५ आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या
क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार फीट इंडिया मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं तीन
दिवसीय खेलो इंडिया वॉटर स्पोर्टस महोत्सवचा आज समारोप झाला.
****
No comments:
Post a Comment