Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक येत्या तीन आणि चार सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीशी संबंधित
काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे.
***
दरम्यान,वाढती महागाई हा देशातल्या
सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठा प्रश्न झाला असून दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या
वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर आकारण्यात येणाऱ्या पाच टक्के
जीएसटीमुळे ही भाववाढ आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तू आणि
मिरचीवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून शून्य टक्के करण्याची मागणी फेडरेशन ऑफ
असोसिएशन ऑफ ट्रेडर्सतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान
नरेंद्र मोदी,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसंच जीएसटी
समितीच्या मुख्य आयुक्तांना पाठविण्यात आलं आहे. सरकारने या मागणीवर लवकरात लवकर
सकारात्मक निर्णय घेऊन महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा
द्यावा,
अशी अपेक्षा फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचेती
यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
****
गणेशोत्सव हा आता राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार
असल्याची घोषणा राज्यशासनातर्फे करण्यात आली आहे.
या महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या हस्ते यानिमित्त गीत
आणि संकेतस्थळाचं लोकार्पण काल मुंबईत झालं
त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धांमधील परितोषिकाची
रक्कमही वाढवण्यात आली असून राज्यस्तरीय
प्रथम विजेत्यास साडेसात लाख रुपये , जिल्हास्तर प्रथम
विजेता पन्नास हजार , तालुकास्तरीय विजेत्यांना २५ हजार रुपये
आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांच्या
प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रियाही उपलब्ध झाली आहे. यासह, भजनी मंडळांना भांडवली अनुदानही दिलं जाणार आहे.संबंधीत माहिती कालपासून
येत्या सहा सप्टेंबर दरम्यान महाअनुदान डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
***
राज्यातल्या आगामी प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांसाठी महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २९ प्रभागांतून ११५ सदस्य
निवडले जाणार आहेत.यासह राज्यातील पुणे ,बृहन्मुंबई तसंच नागपूर, पिंपरी चिंचवड तसंच कल्याण-डोंबिवली महापालिकेतल्या प्रभागनिहाय निवडल्या जाणा-या नगरसेवकांची
एकंदर संख्या जाहिर झाली आहे.
बीड, परभणी तसंच इतर जिल्हा
परिषदांसाठीही प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दरम्यान, प्रारुपावर
येत्या चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि
सूचना पाठवता येणार आहेत.
***
छत्रपती संभाजीनगर पोलिस अधिक्षक कार्यालयातर्फे आज सकाळी साडे सहा वाजता दहा किलोमीटर
सायकलेथॉन-२०२५ स्पर्धा पार पडली. केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या
निर्देशांनुसार फीट इंडिया मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग नोंदवला.
****
हिंगोली इथं आज जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल
यांच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली.
आज सकाळी संत
नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते
हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात झाली.त्यानंतर ही सायकल रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - खटकाळी बायपास -
इंद्रा चौक मार्गे पुन्हा याच मैदानावर येत
संपन्न झाली. शहरातील नागरिकांनी यात उत्स्फुर्त सहभाग नोंदवाला.
****
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या ग्रंथ पुरस्काराचं वितरण
आज माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. यात
नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार ‘अनोखे थायलंड’ प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर
यांना,
म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार- ‘गांधी : वाद आणि वास्तव’
या पुस्तकासाठी सचिन कुसनाळे यांना, बी. रघुनाथ वाङ्मय
पुरस्कार- पांडुरंग मुरारी यांच्या ‘नांगरमुठी’ या साहित्यकृतीला तर पुस्तक
व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती
संभाजीनगरच्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान केला जाईल.
***
नांदेड जिल्ह्यातल्या गंभीर पूरस्थितीनंतर जिल्ह्याचे
पालकमंत्री अतुल सावे आज बाधित क्षेत्राची
पाहणी करणार आहेत. पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा याद्वारे त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल.
***
आगामी अठ्ठेचाळीस तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर
विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची
शक्यता तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील, असा
पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
पडेल,
असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
सरासरी ९७ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment