Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशात या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं
उत्पादन ५०० टक्क्यांनी वाढल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अहमदाबादमधल्या
हंसलपूर इथं संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या सुझुकीच्या पहिल्या जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक
वाहन ‘ई-वितारा’चं
उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आज भारताच्या
स्वावलंबनाच्या आणि हरित गतिशीलतेचे केंद्र बनण्याच्या दिशेने एक खास दिवस असून, भारताच्या
मेक इन इंडिया प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातलं मोबाईल उत्पादन, संरक्षण
उत्पादन, सेमीकंडक्टर आदी क्षेत्रातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. देशात
उत्पादन सुलभ होण्यासाठी लॉजिस्टिक पार्क, औद्यौगिक पार्क उभारण्यात येत
असून, अनेक सुधारणांच्या माध्यमातून उद्योगांमधल्या अडचणी दूर केल्या असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या
दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्ध नौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल
तळावर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या
प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. या दोन्ही जहाजांमध्ये रचना, शस्त्रे
आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून, सागरी
मोहिमांना सामोरं जाण्यासाठी त्या सक्षम असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली.
****
दिल्ली रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी
सक्तवसुली संचालनालय - ईडीने आज दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या
घरासह १३ ठिकाणी छापे मारले. ही कारवाई सुमारे पाच हजार ५९० कोटी रुपयांच्या रुग्णालय
प्रकल्पामधल्या कथित गैरव्यवहारांबाबत करण्यात आली आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी भारद्वाज यांच्यासह खासगी कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे.
****
नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात
केली. नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार
विक्रम काळे,
दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, नांदेडचे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेसचा मराठवाड्यातल्या प्रमुख
जिल्ह्यांना लाभ होईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
ही गाडी आधी जालना ते मुंबई दरम्यान चालत
होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई असा ६१० किलोमीटरचा
प्रवास ही गाडी केवळ साडे नऊ तासात पूर्ण करेल. गाडीचे डबे आठ वरून २० करण्यात आले
असून, प्रवासी आसन क्षमता ५३० वरून एक हजार ४४० पर्यंत वाढवली आहे. ही गाडी नांदेडहून
बुधवार आणि मुंबईहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
****
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला
उद्या राज्यभरात गणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी
सुरू आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक
ओळख आता आणखी दृढ होणार आहे. आकर्षक गणेश मूर्ती, सजावट आणि विविधरंगी
विद्युत रोषणाईचं साहित्य,
पूजा साहित्य, फुलं, आणि
विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या आगमनापासून
ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठीकठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस
यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
****
कझाकस्तानच्या शिमकेंट इथं सुरू असलेल्या
आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात निरू धांडा हिनं सुवर्ण पदक पटकावलं. निरू धांडा, अशीमा
अहलावत आणि प्रीती रजक या महिला चमूनं ट्रॅप सांघिक प्रकारातही सुवर्ण पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत २९ सुवर्ण, ११ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह
एकूण ५४ पदकांची कमाई करत,
अव्वल स्थान कायम राखलं आहे.
****
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा येत्या गुरुवारी झुरीच इथं होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. त्याच्यासमोर ग्रेनेडाच्या
अँडरसन पीटर आणि जर्मनीच्या जुलियन वेबरचं आव्हान असेल.
****
No comments:
Post a Comment