Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच अभिनेते धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक या सदनातल्या
माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंध महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारतीय संघाने मिळवलेल्या विजेतेपदाबद्दल सभागृहानं या महिलांचं अभिनंदन केलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, विरोधकांनी विशेष मतदार यादी पुनरिक्षणासह विविध मुद्दे
उपस्थित करत घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी या सदस्यांना शांत राहून कामकाज सुरु ठेवण्याचं
आवाहन केलं, मात्र घोषणाबाजी सुरुं राहिल्यानं
सदनाचं कामकाज सुरवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित
झालं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच नवीन सदस्यांना शपथ देण्यात
आली. त्यानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांचंही स्वागत करण्यात आलं. यावेळी केलेल्या
भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राधाकृष्णन यांचा सामान्य पार्श्वभूमीतून उपराष्ट्रपती पदापर्यंतचा
प्रवास देशाच्या लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो, असं नमूद केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह पुढे जाण्यासाठी
चर्चा करेल आणि महत्त्वाचे निर्णय घेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. उपसभापती हरिवंश आणि
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सभापतींचं स्वागत केलं.
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात, १८व्या लोकसभेचं सहावं अधिवेशन सुरू होत असल्याचं सांगितलं.
संसद ही राष्ट्राच्या अपेक्षा, जनतेच्या आकांक्षा, लोकशाही मूल्यं आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी
व्यक्त करण्यासाठीचं सर्वोच्च व्यासपीठ असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व सदस्य लोकशाही
परंपरा पाळतील आणि सक्रिय सहभागातून या अधिवेशनाला उत्पादक आणि अर्थपूर्ण बनवण्यात
महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला.
****
अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी, हिवाळी अधिवेशन हे फक्त एक औपचारिकता
नाही, तर राष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी
सुरू असलेल्या प्रयत्नांना ते नवी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला. भारताने प्रत्येक वेळी लोकशाहीची भावना
आणि उत्साह जपत खऱ्या अर्थाने लोकशाही जगली आहे, अशा घटना राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ
करतात, असं पंतप्रधान म्हणाले.
****
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास
संस्थेनं आज जम्मू काश्मीरमधल्या काही भागात छापे टाकले. पुलवामा, शोपियाँन सह दक्षिण काश्मीरमध्ये आठ वेगवेगळया ठिकाणी
हे छापा सत्र सुरु आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात एनआयएनं इरफाम मौलवीच्या
निवासस्थानाची झडती घेतली.
****
एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स
दिन पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात
आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात जागतिक एड्स दिनाच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीनं
काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथच वार्ताहरांशी बोलत होते.
कोणीही न्यायालयात गेलं म्हणून निवडणुकीला विलंब करणं, ही पद्धत आजवर लागू झाली नव्हती. या विषयावर निवडणूक आयोगाकडे
माहिती मागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज छत्रपती संभाजीनगर
दौऱ्यावर असून त्यांनी आज पैठण इथं माध्यमांशी संवाद साधला. निवडणुका स्थगित करण्याच्या
मुद्दयावर शिंदे यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच बोलणार असल्याचं यावेळी स्पष्ट
केलं.
****
दरम्यान, राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा
प्रचार आज रात्री १० वाजता संपणार असून, या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय
नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी - लातूर महामार्गावर काल झालेल्या
भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा
समावेश आहे. हे सर्व बार्शी इथून तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना भरधाव ट्रकची कारला धडक झाल्याने
हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राजस्थान इथं सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय पाचव्या खेलो
इंडिया स्पर्धेत काल महाराष्ट्रानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य पदकं जिंकली. सायकलिंगमध्ये सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाच्या सिद्धी शिर्के आणि मंगेश ताकमोगे यांनी पाच फेऱ्यांच्या एलीट
शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. कोल्हापूर विद्यापीठाच्या सायली आरंडेनं सायकलिंग ट्रॅक
स्पर्धेत दोन कास्य पदकं मिळवली, तर महिलांच्याच स्क्रॅच प्रकारात पुणे विद्यापीठाच्या आदिती
डोंगरेनं रौप्य पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment