Monday, 13 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१३ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

जागतिक रेडिओ दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संवाद साधण्यासाठी रेडिओ हे एक उत्तम माध्यम असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. रेडिओ वरच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जनतेशी संवाद साधणं खूप सोपं झालं असल्याचं ते म्हणाले. रेडिओ जगतात काम करणार्या सर्वांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं असून, हे माध्यम सक्रीय आणि सक्षम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.   

****

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ५० किलोमीटरच्या अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टीक प्रकारातल्या पृथ्वी क्षेपणास्त्राची यसस्वी चाचणी केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संरक्षण संशोधन विकास संस्था - डी आर डी ओ चं अभिनंदन केलं आहे. भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं राष्ट्रपतींनी डी आर डी ओ चे अध्यक्ष एस ख्रिस्तोफर यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. यामुळे क्षेपणास्त्रांच्या येणार्या धमक्यांपासून देशाला सुरक्षा प्राप्त झाली असल्याचं ते म्हणाले.

****

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर नागपूरच्या प्रचार सभेत झालेल्या शाईफेकीशी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपाचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई इथं ते काल वार्ताहर परिषदेत बोलत होते. तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनंच हे कृत्य केलं आहे, मात्र पक्षाची बदनामी टाळण्यासाठी भाजपावर आरोप केले जात असल्याचं ते म्हणाले. 

****







येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर संबंधीत शाळांना प्रवेशपत्रांसह, प्रात्यक्षिक परीक्षा आणि कल चाचणी यासाठी लागणारं साहित्य आज सकाळी दहा वाजेपासून वितरित केलं जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय वितरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळानं कळवलं आहे.

//******//

No comments: