Wednesday, 15 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१५ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं आज पी एस एल व्ही सी ३७ या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात झेपावले. कार्टोसॅट-दोन हा यात मुख्य उपग्रह असून त्याचं वजन ७१४ किलो आहे. अन्य १०१ उपग्रह परदेशी आहेत. पी एस एल व्ही प्रक्षेपकाचं हे ३९ वं उड्डाण आहे.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु झालं आहे. ११ जिल्ह्यातल्या ६७ मतदारसंघातून ७२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ६९ मतदारसंघासाठी हे मतदान होत असून, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.  

****

पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून १०० केंद्र सुरू करण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं. नवी दिल्लीतल्या कुलगुरू आणि संचालकांच्या वार्षिक परिषदेत त्यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. कृषी पदवीधरांचे सर्व अभ्यासक्रम रोजगाराशी निगडीत करण्यात आले असून हे अभ्यासक्रम व्यावसायिभिमुख करण्यात आल्याचं ते म्हणाले. ‘स्टुडंट रेडी’ या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला एक हजार रुपयांवरुन तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

****







विधानपरिषदेवर निवडून आलेल्या चार सदस्यांचा शपथविथी काल पार पडला. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. रणजित पाटील आणि शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विक्रम काळे, नागो पुंडलिक गाणार, बाळाराम पाटील यांनी काल विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.

//*******//

No comments: