Friday, 10 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 10 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्र सरकार लवकरच महिला सक्षमीकरण विधेयक पारित करणार असल्याचं, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशातल्या अमरावती इथं आयोजित राष्ट्रीय महिला संसद परिषदेत ते आज बोलत होते. या तीन दिवसीय परिषदे संसदेसह देशाच्या सर्व राज्य विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधी तसंच देशभरात उच्च शिक्षण घेणारे सुमारे दहा हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

****

भारत डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असल्याचं, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. डिजिटल कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद केली असल्याचं ते म्हणाले. ‘टेलि गाव’ हा उपक्रम एक हजार गावांमध्ये सुरु झाला असून, यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

दिव्यांग कायद्याअंतर्गत नियमावली मार्च अखेरपर्यंत निश्चित करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यशाळेत बोलत होते. १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून हा कायदा देशभरात लागू करणार असल्याचं ते म्हणाले. या कायद्यातील तरतुदींसाठी तज्ज्ञांकडून सूचना मागवल्याचं ते म्हणाले. 

****

अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी व्ही के शशिकला यांची निवड अवैध असल्याचं, पक्षाचे अध्यक्ष ई मधुसुदन यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या नियमानुसार शशिकला यांनी सलग पाच वर्षे पक्षाच्या सदस्य म्हणून कार्य केलेलं नसल्यामुळे त्या या पदावर नियुक्तीसाठी पात्र नसल्याचं, आपण निवडणूक आयोगाला लेखी कळवलं असल्याचं मधुसुदन यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रध्वजाचा वापर करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. नागरिकांमध्ये राष्ट्राप्रती आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रगीतासंबंधी काही नियम कडक करण्याची मागणी यात केली आहे. याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे.

****

यंदाचा मराठी भाषा गौरव दिन ‘संगणक आणि महाजालावरील मराठी’ या संकल्पनेवर साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती २७ फेब्रुवारी ही दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी जनांनी देवनागरी लिपीत एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर टंकलिखित करावा, असं आवाहन मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ कोटी २२ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या कर्जाची परतफेड करण्यासाठी एकूण १७१ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ६५ कोटी रुपये निधी गेल्या मार्चअखेर पर्यंत वितरित करण्यात आला होता.

****

राष्ट्रीय जंतनाशक दिन आज पाळण्यात आला. सरकारनं देशातल्या ३४ कोटी मुलांना जंतनाशक गोळ्यांचं वितरण करण्याचं उद्दीष्ट ठेवलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शाळेत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. मराठवाड्यात इतरत्रही शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं पुढच्या महिन्यात होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय यांनी दिल्या आहेत. पैठण इथं याबाबत झालेल्या आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या.
दरम्यान, पैठण नगर परिषदेतर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील लाभार्थींशी जिल्हाधिकारी पांडेय यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. पैठण नगर परिषदेतर्फे या अभियानांतर्गत एक हजार ३५० शौचालयं बांधण्यात आली आहेत.

****

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान उचलूनही अद्यापपर्यंत शौचालय न बांधणाऱ्यांवर लातूर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या पथकानं शहराच्या दोन वसाहतीत केलेल्या सर्वेक्षणात ३५ जणांनी अनुदान उचलूनही शौचालय बांधलं नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पैकी ३० जणांनी लवकरच शौचालय बांधू असं शपथपत्र सादर केलं. मात्र पाच जणांनी टाळाटाळ केल्यानं, त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

भारत आणि बांग्लादेशदरम्यान हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतानं आपला पहिला डाव ६८७ धावांवर घोषित केला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं २०४, मुरली विजयनं १०८, रिद्धीमान सहानं नाबाद १०६, चेतेश्वर पुजारानं ८३ आणि अजिंक्य रहाणेनं ८२ धावा केल्या.

****

No comments: