Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 13 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
आधार कार्ड सक्तीचं करणारं विधेयक, वित्त विधेयक म्हणून मांडण्याच्या निर्णयाला
आव्हान देता येणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आधार विधेयक वित्त विधेयकाच्या
स्वरुपात मांडण्याला आव्हान देणारी याचिका माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दाखल
केली आहे. एखादं विधेयक वित्त विधेयक आहे की नाही याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्षांचा
असतो आणि त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.
****
सुट्टीकालीन प्रवास भत्ता-एलटीसीचा गैरवापर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची
कारवाई केली जाईल, असा इशारा कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिला आहे. यासंदर्भात
विभागानं जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार अशा प्रवासाबाबत कर्मचाऱ्यांना
प्रवास केल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. यात चुकीची माहिती देणाऱ्यांवर
कारवाई केली जाईल असे निर्देश विभागानं दिले आहेत.
****
जागतिक रेडिओ दिवस आज साजरा करण्यात आला. मनोरंजन, माहिती आणि दुरसंवादाचं माध्यम
म्हणून रेडिओची भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू आणि राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी
रेडिओ दिनानिमित्त रेडिओचे श्रोते आणि या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा
दिल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून दिलेला संदेश थेट लोकांपर्यंत जाणारा असतो, असं
नायडू म्हणाले. तर जनसंवाद वाढवणारं रेडिओ हे सर्वात पहिलं माध्यम असल्याचं राठोड यांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातली शेतजमीन, पीक नमुने आणि शेतकऱ्यांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी,
त्यात आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत. भूमी अभिलेख संचालनालयानं संपादित केलेल्या
जमिनीसंबंधी ५० टक्के माहितीचं डिजिटायझेशन करण्यात आलं असून, ही माहिती राज्याच्या
कृषी विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मध्य प्रदेशातल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं २००८ ते २०१२ या कालावधीत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ६०० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले
आहेत. चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवल्याप्रकरणी याप्रकरणी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता. या आदेशाविरुद्ध विद्यार्थ्यांनी सर्वोच्च
न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाचा
निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला.
****
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गेल्या
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचा
आज समारोप होत आहे, आज सकाळच्या सत्रात शास्त्रीय नृत्य आणि प्रहसनपर लघुनाटिका
सादर झाल्या. त्यासोबतच रांगोळी स्पर्धा, स्पॉट पेंटिंग तसंच स्पॉट फोटोग्राफी स्पर्धा
ही आज घेण्यात आल्या. या महोत्सवात देशभरातून ७७ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत.
****
परळी इथं येत्या २७ फेब्रुवारीला चौथ्या
बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय संमेलनाचं
उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानीत सुप्रसिध्द साहित्यिक डॉ वीरा राठोड यांच्या
हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण साहित्यीक नागनाथ बडे यांची निवड
झाली आहे. या संमेलनात परिसवांद, शिक्षक गौरव पुरस्कार वितरण, कथाकथन आणि कवी संमेलन
आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हैदराबाद इथं झालेला भारत विरुद्ध बांग्लादेश
कसोटी सामना भारतानं १०८ धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या डावात ४५८ धावांचा पाठलाग करताना
बांग्लादेशचा संघ २५० धावात सर्वबाद झाला. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि
रविंद्र जडेजानं प्रत्येकी चार आणि इशांत शर्मानं दोन बळी घेतले. पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली
‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा हा सलग सहावा
कसोटी मालिका विजय आहे. या कसोटी सामन्यात
फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सर्वात कमी ४५ कसोटी सामन्यात २५० बळी मिळवणारा
पहिला गोलंदाज ठरला, तर कोहली
हा सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
****
लातूर जिल्ह्यात शिवसेना जिल्हा परिषदेच्या
३९ जागा लढवत असली तरी अध्यक्ष निवडताना मात्र शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार असल्याचा
दावा, राज्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे.
लातूर इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी रावते यांनी शिवसेनेचा लातूर जिल्हा
परिषद निवडणुकीसाठी वचननामा प्रकाशीत केला.
****
No comments:
Post a Comment