Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 17 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मतमोजणी
प्रक्रियेत केंद्रनिहाय मत जाहीर न करणाऱ्या ‘टोटलायझर’ या यंत्राच्या वापराला केंद्र
सरकारनं नकार दिला आहे. निवडणूक आयोगानं केंद्राकडे या यंत्राच्या वापराचा प्रस्ताव
दिला होता, यासंदर्भात गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिगटानं
हा प्रस्ताव अमान्य केला असून, निवडणूक आयोगाला हा निर्णय कळवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेससह काही राजकीय पक्ष या यंत्राच्या वापरास अनुकूल असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
हृदयविकावर
उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या स्टेंटचा तुटवडा भासवणाऱ्या कंपन्यांविरोधात केंद्र सरकारनं
कारवाईचा इशारा दिला आहे. हृदयविकारानं पीडित रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात स्टेंट उपलब्ध
करुन देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याचं औषध विभागाचे सचिव जयप्रिय
प्रकाश यांनी सांगितलं. अशा कंपन्यांवर आपण लक्ष ठेऊन असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं
आहे.
****
विमुद्रीकरणानंतर
चलनस्थिती काही आठवड्यातच पूर्वपदावर आली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनी नोटांच्या छापखान्यामधून अव्याहतपणे चलन
छपाईचं काम चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. रोखे छपाई आणि टाकसाळ महामंडळाच्या स्थापना
दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी
रात्रंदिवस काम करुन चलन छपाईमध्ये दिलेल्या योगदानाचं केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव
शक्तिकांत दास यांनी यावेळी कौतुक केलं.
****
दरम्यान,
विमुद्रीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नव्यानं उभारी घेईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे
गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत बोलत होते. चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धीचा दर अंशत: घसरला असला, तरी
येत्या आर्थिक वर्षात वृद्धीचा दर वाढेल, असं ते म्हणाले.
****
हवामान
बदलावर माहिती देणारी ‘विज्ञान एक्सप्रेस’ आज दिल्लीहून रवाना झाली. पयार्यावरण मंत्री
अनिल दवे, विज्ञान आणि तंद्धज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
ही एक्सप्रेस संपूर्ण देशात भ्रमण करणार असून २० राज्यातल्या ६८ स्थानकावर तिचा मुक्काम
असेल. या महिन्यात हरियाणा आणि त्यानंतर पंजाबमध्ये काही शहरात या रेल्वेचा मुक्काम
असेल. येत्या आठ सप्टेंबरला गुजरातमध्ये गांधीनगर इथं या रेल्वे प्रवासाचा समारोप होणार
आहे.
****
भारतात
येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या यावर्षी १६ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी महिन्यात
नऊ लाख ८३ हजार विदेशी पर्यटक भारतात आल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात
म्हटलं आहे. ई व्हिसाच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली असल्याचं
या पत्रकात म्हटलं आहे. पर्यटन मंत्रालय दर महिन्याला ई व्हिसावर आलेल्या पर्यटकांची
संख्याही जाहीर करणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रंखलेचा हा २९वा भाग असेल. या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी
आपल्या सूचना आणि विचार २२ फेब्रुवारी पर्यंत नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही
ओपन फोरम वर, तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर
पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
‘सामना’
या शिवसेनेच्या मुखपत्राचं प्रकाशन तीन दिवस थांबवण्याची भाजपा कार्यकर्त्याची मागणी
चुकीची आहे, असं केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान सामना या वृत्तपत्राचं प्रकाशन तीन
दिवस थांबवण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यानं निवडणूक आयोगाकडे केली होती. वृत्तपत्रांनी
सरकारविरोधात काहीही छापू दे, मात्र निर्णय हा जनतेचाच राहील, असं नायडू म्हणाले.
****
भारतीय
स्टेट बँकेत पाच बँकांच्या विलिनीकरणामुळे बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणावर बंद होऊन,
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बँकिंग सेवांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता, अखिल भारतीय
बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव सी एच वेंकटाचलम यांनी व्यक्त केली आहे. बिकानेर आणि
जयपूर स्टेट बँक, हैदराबाद स्टेट बँक, म्हैसूर स्टेट बँक, पटियाला स्टेट बँक आणि त्रावणकोर
स्टेट बँक या पाच बँकांच्या भारतीय स्टेट बँकेत विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली, त्या पार्श्वभूमीवर वेंकटाचलम बोलत होते. दरम्यान, या निर्णयाविरोधात
आज औरंगाबाद इथं बँक कर्मचारी संघटनांच्या वतीनं भारतीय स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात येत आहेत.
****
No comments:
Post a Comment