Saturday, 11 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 11 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतीय रिझर्व बँकेसोबत चर्चा केल्यानंतर राजकीय निधीसाठी पर्याय सूचवले जातील, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं रिझर्व बँकेच्या मंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यावेळी उपस्थित होते. या बैठकीत देशाची आर्थिक परिस्थिती आणि अर्थसंकल्पावरील सूचनांवर चर्चा करण्यात आल्याचं जेटली यांनी सांगितलं. बँकांच्या थकित कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरु असून, यासाठी काही कायदेही अस्तित्वात असल्याचं ते म्हणाले.   

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सी बी डी टीनं आयकर विभागाला, प्रामाणिक करदात्यांना शिष्ठाचार आणि प्रतिष्ठेची वागणूक देण्याचं आवाहन केलं आहे. नियमीत कर भरणाऱ्यांना लवकर आणि नियमात मदत करावी, असं सी बी डी टीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी याबाबत आयकर विभागाला लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर नियमित आयकर न भरणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे, मात्र यात प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नसल्याचं चंद्रा यांनी स्पष्ट केलं.    

****

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ५० किलोमीटरच्या अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टीक प्रकारातल्या क्षेपणास्त्राची आज ओडिशा इथल्या अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली. पी डी व्ही मिशन अंतर्गत झालेली ही चाचणी बॅलेस्टीक क्षेपणास्त्र संरक्षण भक्कम करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचं, संरक्षण संशोधन विकास संस्था - डी आर डी ओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. दुपारी चार वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

तामिळनाडूचे शिक्षणमंत्री के.पंडीयाराजन, कार्यवाहक मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या गटात सहभागी झाले आहेत. तामिळनाडुमध्ये सत्ताधारी पक्ष अण्णा द्रमुकच्या दोन गटात सत्तासंघर्ष सुरु असून, पनीरसेल्वम आणि पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. शशिकला यांनी पाठिंबा देणाऱ्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला, मात्र शिक्षणमंत्री पंडीयाराजन यांनी, अनेक आमदरारांना पनीरसेल्वम यांच्या गटात यायचं असल्याचं सांगितलं. शिक्षणमंत्र्यांसोबतच खासदार पी आर सुंदरम आणि खासदार अशोक कुमार यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, शशिकला यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. संविधान, लोकशाही आणि राज्याचं हित लक्षात घेऊन राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

****

गेल्या पाच वर्षात प्रथमच जास्तीत जास्त प्रकल्प नियोजित वेळेत आणि खर्चात पूर्ण करण्यात भारताला यश मिळालं आहे. जागतिक प्रकल्प व्यवस्थापन संस्थेनं केलेल्या पाहणीत ही बाब नमूद करण्यात आली. दिरंगाईमुळे प्रकल्पावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचं प्रमाण आता भारतात इतर विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. यासंदर्भात भारतानं चीन आणि आखाती देशांना मागे टाकलं असल्याचं या संस्थेच्या भारतातील प्रतिनिधींनी सांगितलं.

****

पुण्याच्या मावळ परिसरातल्या पाचाणे गावात दीडशे जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. याठिकाणी काल पायबा महाराजांच्या उत्सवानिमित्त उरूसाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलेल्या पेढ्यातून विषबाधा झाल्यानं, गावकऱ्यांना तात्काळ उपचारासाठी आजुबाजुच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी देवळाबाहेरील एका पेढेवाल्याच्या दुकानातला माल जप्त केला असून, तो तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहे.

****

मुंबईत परळ इथल्या टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या तळघरातल्या औषधांच्या साठ्याला आज आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.

****

सर्वसमावेशित शिक्षण योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा इथं येत्या १४ फेब्रुवारीला ‘१८ वर्ष वयोगटापर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि पूनर्वसन’ याविषयी माहिती दिली जाणार आहे, तसंच जनजागृती कक्षही उभारले जाणार आहेत. असे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवसअखेर बांग्लादेशच्या सहा बाद ३२२ धावा झाल्या. भारताकडून उमेश यादवनं दोन, तर इशांत शर्मा, आर अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

No comments: