Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 12 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
विमुद्रीकरणानंतर बँक खात्यात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या नागरिकांना नोटीसचं उत्तर देण्यासाठी
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
·
मराठवाड्यात
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या प्रचाराला वेग
·
राष्ट्रीय
लोकअदालतींमध्ये
साडेतीन लाख प्रकरणं निकाली
आणि
·
भारताविरूद्धच्या
कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशच्या सहा बाद ३२२ धावा
विमुद्रीकरणानंतर बँक खात्यात पाच लाख
रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या १८ लाख नागरिकांना सरकारनं पाठवलेल्या नोटीसचं
उत्तर देण्याची मुदत १५ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या
आधी नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या
सर्व खातेधारकांना ई साक्षांकन करणं आवश्यक असून, ही
प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या खातेधारकांची बँकखाती गोठवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आयकर विभागानं प्रामाणिक करदात्यांना
प्रतिष्ठेची वागणूक द्यावी, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सी
बी डी टीनं म्हटलं आहे. मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी याबाबत आयकर विभागाला
लिहिलेल्या पत्रात, नियमित कर भरणाऱ्यांना आयकर नियमांतर्गत लवकरात लवकर मदत
करावी, असं म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर नियमित आयकर न भरणाऱ्यांची
चौकशी करण्यात येणार आहे, मात्र प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना कोणताही
त्रास होणार नसल्याचं चंद्रा यांनी स्पष्ट केलं.
****
बँकांच्या थकित कर्जाच्या समस्येवर
तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं, केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं रिझर्व बँकेचे गव्हर्नर
उर्जित पटेल यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी
बोलत होते. या बैठकीत आर्थिक परिस्थिती आणि अर्थसंकल्पावरील सूचनांवर चर्चा
करण्यात आल्याचं जेटली यांनी सांगितलं.
****
त्रिपुरातल्या धलाई
इथं काल रात्री साडेतीन रिश्टर
स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, असं पृथ्वी
विज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.
रूद्रप्रयाग इथं तीन रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचा धक्का बसला.
भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ५
किलोमीटर खोल होता. रूद्रप्रयागला यापूर्वी गेल्या सोमवारी जवळपास सहा तर मंगळवारी साडेतीन रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला
होता.
****
भारतीय अंतराळ संशोधन
संस्था - इस्त्रो येत्या १५ फेब्रुवारीला पी एस एल व्ही सी ३७ या प्रक्षेपकाद्वारे
एकाचवेळी १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. आंध्र
प्रदेशातल्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन बुधवारी सकाळी नऊ वाजून
२८ मिनिटांनी या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. पी
एस एल व्ही प्रक्षेपकाचं हे ३९ वं उड्डाण असेल. पृथ्वी
निरीक्षण करणाऱ्या मालिकेतील कार्टोसॅट -दोन हा यात मुख्य उपग्रह असून त्याचं
वजन ७१४ किलो आहे. प्रक्षेपित होणारे अन्य १०१ उपग्रह परदेशी आहेत. एकाचवेळी
सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे.
****
मराठवाड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत
समिती निवडणुकांसाठीच्या प्रचाराला वेग आला आहे. ठिकठिकाणी
राजकीय नेत्यांच्या प्रचार सभाचं आयोजन केलं जात असून राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुरोरी, तर
बीड जिल्ह्यात तेलंगाव इथं प्रचार सभा झाल्या.
तुरोरी इथं बोलतांना मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या हक्काच सात दशलक्ष घनमीटर पाणी देण्यासाठी
निधी कमी पडू देणार नसल्याच आश्वासन दिलं.
तेलगाव इथं बोलतांना गोपीनाथ मुंडे
हे इतिहास बदलणारे नेते होते,
असं सांगत त्यांच्या जन्मतारखेबद्दल वाद निर्माण केल्याबद्दल नापसंती व्यक्त केली.
****
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची काल बदनापूर तालुक्यात कडेगाव इथं
तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची वाघुळ इथं सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उस्मानाबाद जिल्ह्यात
जाहीर सभा झाली.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील प्रचारसभेबाबत अनिश्चितता असली तरी, उद्यापासून भाजपचे केंद्र आणि राज्यातील नेते प्रचाराला प्रारंभ करणार आहेत.
प्रचारा दरम्यान काही गैरप्रकार समोर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची काल नागपूर इथं प्रचार
सभा सुरु असतांना एका कार्यकर्त्यानं त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.
आदर्श आचार संहितेनुसार, खाजगी अनुदानित
संस्थांचे कर्मचारी प्रचारात सहभागी होऊ शकत नाही मात्र, बीड
इथल्या दोन खाजगी संस्थांचे कर्मचारी प्रचारात सहभागी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर
त्यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
****
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे
बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
देशभर काल घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये साडेतीन लाख प्रकरणं निकाली काढण्यात आली. औरंगाबाद इथं झालेल्या लोकअदालतीत एकूण एक हजार ३४२ प्रकरणं निकाली निघाली. या सर्व
प्रकरणांमध्ये एकूण ५ कोटी २४ लाख १९ हजार ६०० रूपयांची तडजोड झाली. या लोकअदालतीत
एकूण ४० पॅनल्सकडं २३ हजार २९० प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी
ठेवण्यात आली होती.
लातूर जिल्ह्यात
जवळपास तीन कोटी रुपये रकमेची
दिवाणी प्रकरणं निकाली काढण्यात आली. यावेळी फौजदारी स्वरूपाच्या ४७५ आणि वादपूर्व
३१ अशी एकूण ५०६ प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली.
****
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं अवैध
कारवाई प्रतिबंधक कायदा युएपीए अंतर्गत मध्य प्रदेशात इंदूर इथून एकाला ताब्यात घेतलं
आहे. झादील परवेज असं याचं नाव असून, तो
ठाण्याच्या तबरेज याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचं समोर आलं
आहे. तबरेज हा अवैध कारवाई प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. झादीलचा
भाऊ आमिल हा सिमी या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य होता, त्याला
२००८ साली शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात
भारतीय जनता पक्ष आणि बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
झाली. विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सुरू असलेल्या या कार्यक्रमावर
बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकार घडला. या
वेळी सभागृहातल्या फर्निचरची मोडतोड झाल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर बाजार समितीच्या आवारात भारतीय राष्ट्रीय कृषी माल उत्पादन महासंघ- नाफेडच्यावतीनं सुरु असलेल्या तूर खरेदी केंद्रात
साठवणुकीला जागा नसल्यामुळे हे खरेदी
केंद्र कालपासून तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.
येत्या दोन दिवसात या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास
केंद्र सुरु केलं जाईल असं नाफेडच्यावतीन सांगण्यात आलं आहे.
****
अंधांच्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि
पाकिस्तान या संघात होणार आहे. काल झालेल्या
उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचा १४७ धावांनी पराभव केला.आज
बंगळुरू इथं चिन्नास्वामी क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे.
****
भारत बांग्लादेश हैदराबाद कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशच्या सहा बाद ३२२ धावा झाल्या. भारताकडून उमेश यादवनं दोन, तर इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला. भारतीय संघानं आपला पहिला डाव ६८७ धावांवर घोषित केला होता. बांगलादेशचा संघ सध्या ३६४ धावांनी पिछाडीवर आहे.
****
लोकसभेच्या अध्यक्ष
सुमित्रा महाजन आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज
सायंकाळी त्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. सरस्वती
भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त उद्या महाजन यांच्या उपस्थितीत विशेष
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंगोली इथं आज पासून चारदिवसीय १५
व्या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला बायपासजवळील शांतीनगर बळसोंड
शिवारातल्या जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं या परिषदेचं
आयोजन केलं जात आहे. यावेळी रक्तदान शिबीर, भीम
आणि बुद्ध प्रेरणा गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
//******//
No comments:
Post a Comment