Monday, 13 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      महिलांना सन्मानानं आरक्षण मिळालं पाहिजे - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

·      जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत चार अतिरेकी  ठार तर, दोन जवानही शहीद

·      राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परीषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

आणि

·      भारताविरूद्धचा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी बांग्लादेशला ३५६ धावांची गरज

****

महिलांना सन्मानानं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी कोणताही कुठलाही वितंडवाद होता कामा नये असं परखड मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल व्यक्त केलं. राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोपप्रसंगी त्या काल आंध्रप्रदेशातल्या अमरावती इथं बोलत होत्या. महिला आरक्षण ही काळाची गरज असून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. महिलांचं सशक्तीकरण म्हणजे ही पुरूषांविरूद्धची लढाई नसल्याचं त्या म्हणाल्या. एकूण लोकसंख्यपैकी पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांनी पुढे येणं आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या.

****

राष्ट्रीय उत्पादकता सप्ताहाला काल प्रारंभ झाला. देशभरात सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो. कपात, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापराद्वारे कचऱ्यातून नफा ही यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहादरम्यान कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, निबंध आणि वादविवाद स्पर्धा यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

****

येत्या जुलैपासून वस्तू आणि सेवा कर - जी.एस.टी. लागू झाल्यानंतर सरकारला अर्थसंकल्पीय कर संकलन अंदाजात सुधारणा करावी लागण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी काल नवी दिल्ली इथं पी.टी.आय.ला सांगितलं. अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या महसुलाचा अंदाज ठरवताना नेहमीची पध्दत वापरण्यात आली आहे. मात्र या जुलैपासून अप्रत्यक्ष करांऐवजी जी.एस.टी. लागू होणार असल्यानं यंदाचं वर्ष वेगळं असणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या नागबल या गावात काल पहाटे भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत चार अतिरेकी ठार झाले तर, भारताच्या राष्ट्रीय रायफल्सचे दोन जवानही शहीद झाले. तसंच एका स्थानिक युवकाचा मृत्यु झाला आणि मेजरसह तीन जवान जखमी झाले. मृत चारही अतिरेकी हे लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. लष्कराला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

****

येत्या २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती कृषी क्षेत्रासाठी मोठ्या सुधारणांवर विचार करत आहे. शेतीकडे नफा केंद्रीत दृष्टीकोनातून पाहणं, उत्पादकता वाढवणं आणि खर्च कमी करणं यासाठी ही समिती काही सूचना करणार असल्याचं समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी काल हैदराबाद इथं सांगितलं. कृषी मालाला उठाव मिळण्यासाठी बाजारपेठ व्यवस्थेत सुधारणा करणं आणि पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यांवर लक्ष केंद्रीत करणं याबाबतही उपाय सुचवले जातील. या संदर्भात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरकारांना व्यवहार्य आणि प्रत्यक्षात आणण्यास सोप्या उपायांवर विचार होत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

      आगामी वर्षात केंद्र सरकारच्या सुमारे दोन लाख, ८३ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज आहे. याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. पोलीस खातं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, टपाल खातं आदी विभागांमध्ये अनेक पदांवर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

****

विवाहित बहिणीला तिच्या पती किंवा सासरच्यांकडून वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर भाऊ आपला हक्क सांगू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार भाऊ हा विवाहित बहिणीचा वारस किंवा कुटुंबाचा सदस्य होऊ शकत नाही असं यासंदर्भातल्या प्रकरणात न्यायालयानं नमूद केलं आहे. अशा प्रकरणात स्त्रीला अपत्य नसल्यास वारसा हक्क तिच्या पतीच्या अन्य वारसांकडे जाऊ शकतो असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परीषद- पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्व पक्षांनी आता प्रचारात चांगलाच वेग घेतला असून उमेदवारांबरोबरच नेते आणि कार्यकर्ते जीव तोडून प्रचार करतांना दिसत आहेत. मुंबई तसंच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसून येत आहे. दिग्गज राजकीय नेते प्रचारात उतरले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकमेकांवरच्या आरोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल नोटा बंदीच्या निर्णयावरून चांगलीच जुगलबंदी पाहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल मुंबईत जोरदार प्रचार करत शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षावर टीका केली.

मराठवाड्यातल्या जिल्हा परीषद आणि पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत असून अवघ्या तीन दिवसांवर मतदान आलं असून सभा, प्रचार फेऱ्या आणि घरोघर जाऊन प्रचार केला जात आहे. बहुतांशी ठिकाणी राज्यातले सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्या सर्वांच्याच राजकीय ताकदीचा कस या निवडणुकीत लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यात प्रचार केला, लातूर इथल्या प्रचार दौऱ्यात बोलतांना त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्प तयार करण्यात आला असून देशासाठी पथदर्शी ठरणार असलेल्या या प्रकल्पात मराठवाड्याचा समावेश करण्यात आला असल्याचं सांगितलं. या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेनं पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजुर केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. ज्यांना काळा पैसा पचवता आला नाही अशा नेत्यांचाच नोटाबंदीला विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

परभणीजवळच्या पिंगळी इथं आयोजित सभेत बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह आरोग्य आणि शिक्षण देण्यासाठी शासन कटीबध्द असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं. नांदेड जिल्ह्यात नरसी इथंही मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा झाली.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात प्रचारामध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून त्यांनी मतदारांशी सभा, प्रचार फेऱ्या आणि भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कावर अधिक भर दिला आहे. बीड जिल्ह्यात काकू नाना विकास आघाडीच्या उमेदवारांनीही प्रचारात बाजी मारत या लढतीत रंगत आणली आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या विशेषतः प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी उघडली असून गट गण निहाय प्रचाराचं नियोजन केलं आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल प्रचार केला. भविष्यात तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत वर्चस्व निर्माण करण्याची समान संधी सर्वच राजकीय पक्षांना मिळाली असून त्यांच्या ताकदीचा अंदाज हा निवडणूक निकालानंतर दिसून येईल.

****

राज्यातल्या विविध वीज परिमंडळामधल्या थकीत वीज बिलांच्या वसुलीचं उद्दीष्ट पूर्ण न झाल्यास महावितरणच्या संबंधीत कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचं वेतन दिलं जाणार नाही, असं महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी म्हटलं आहे. राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची बैठक नुकतीच औरंगाबाद इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. निर्धारित उद्दीष्टाप्रमाणे वसुली न झाल्यानं गेल्या वर्षीची चार हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त तूट असल्यानं देय वेतनाबाबत अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतानं दृष्टि बाधितांचा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. काल बेंगलुरु इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं ठेवलेलं १९८ धावांचं उद्दिष्ट भारतानं अठराव्या षटकातच पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद १०३ धावा झाल्या. त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार गडी बाद १५९ धावांवर घोषित करत, बांग्लादेशला ४५९ धावांचं लक्ष्य दिलं. बांग्लादेशला आज शेवटच्या पाचव्या दिवशी ३५६ धावा करण्याचं आव्हान असणार  आहे.

दरम्यान, भारताचा  फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं या  कसोटी सामन्यात एका आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. सर्वात कमी ४५ कसोटी सामन्यात २५० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

//******//

No comments: