Thursday, 16 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परीषदांसह राज्यातल्या १५ जिल्हा परीषद आणि १६५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

·      एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा विक्रम

·      भारतीय स्टेट बँकेपाच दुय्यम बँकांचं विलीनीकरण रण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

आणि

·      कुपोषण थांबवण्यासाठी केलेल्या उपाय योजनांसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

****

राज्यात पहिल्या टप्प्यातल्या १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला प्रारंभ होणार आहे. १५ जिल्हा परिषदांच्या ८५५ जगांसाठी, चार हजार २७८, तर १६५ पंचायत समित्यांच्या एक हजार ७१२ जागांसाठी, हे मतदान होत असून सात हजार ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या आठ तसंच जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परीषदांचा यात समावेश आहे. तदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदानाची वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत असेल. मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

****

भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोनं  एकूण १०४ उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्री हरीकोटा इथल्या, सतीश धवन अवकाश केंद्रात सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी पी एस एल व्ही - सी ३७ या यानातून या सर्व उपग्रहांचं  यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणाचे सर्व चारही टप्पे नियोजनानुसार पार पडले असून, पाचशे पाच किलोमीटरच्या उंचीवर सूर्याच्या समकालिक कक्षेत हे सर्वउपग्रह स्थापित करण्यात आले आहेत.

इस्त्रोनं केवळ विक्रमी संख्येनं उपग्रहच अवकाशात सोडले नसून, पी एस एल व्ही च्या क्षमतेतही वाढ झाली असल्याचं, इस्त्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं.

राष्‍ट्रपती प्रण मुखर्जी आणि पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं विक्रमी संख्येनं उपग्रह अवकाशात सोडल्याबद्दल  अभिनंदन केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ फेब्रुवारीला, आकाशवाणीवरील,‘ मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा २९वा भाग असेल. या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार २२ फेब्रुवारी पर्यंत नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही या खुल्या स्थळावर, तसंच, १८०० ११ ७८००  या टोल फ्री क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

भारतीय स्टेट बँकेच्या पाच दुय्यम बँकांचं विलीनीकरण रण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. या पाच दुय्यम बँकामध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश आहे. या सर्व बँकांच्या संचालक मंडळानं यापूर्वीच विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.

****

शाळांमध्ये शिक्षा करताना छडीच्या वापराबाबत सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती शाळांना देण्याची सूचना, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे. उत्तर प्रदेशातल्या एका शाळेत लहान मुलांना शिक्षा करताना मोठ्या प्रमाणात छडीचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर हे नियम तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं हे नियम तयार केले असून, ते लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोचवावेत, असं त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

कुपोषण थांबवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाय योजनासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. आदिवासी कुटुंबातल्या मुलांच्या कुपोषणाला सरकारची अनास्था जबाबदार असल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकेची काल सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं कुपोषण रोखण्यासाठी सरकार निधी देतं, परंतु, तो निधी कुठे जातो, मुंबई पासून १०० किलो मिटर अंतरावर असलेल्या भागात कुपोषणमुळे मृत्यू होतात, तर राज्यातल्या दुर्गम भागात काय होत असेल, अशी विचारणा उच्च न्यायालयानं केली आहे.

****

राज्यातल्या ३६  जिल्हा जात पडताळणी समित्यांमध्ये, प्रत्येक जिल्हा निहाय प्रलंबित प्रकरणं, उपलब्ध अधिकारी- कर्मचारी  यासंबधी माहिती देणारा अहवाल एका आठवड्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल राज्य सरकारला  दिले. शासनानं २०१६ मध्ये विभागीय जात पडताळणी समिती ऐवजी, जिल्हानिहाय जात पडताळणी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अशा समित्या स्थापन करण्यासाठी कुठल्याही सोयी-सुविधा, तसंच, अधिकारी कर्मचारी नियुक्त केले नाहीत, अशा आशयाची एक याचिका, ह्युमन डेव्हलप्मेंट सोसायटी या संस्थेनं न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपिठानं हे आदेश दिले.

****

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या प्रकाशनावर निवडणूक काळातल्या १६, २० आणि २१ फेब्रुवारी असे तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. सामनामधल्या वृत्तामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचं भाजपानं आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक  उद्धव ठाकरे यांनी या मागणी विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही मागणी म्हणजे आणीबाणीचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

रेडिओ किसान दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सारोळा इथं आकाशवाणी किसान पुरस्कारांचं काल सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावर्षीचा आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार विनायक हेगाणा आणि चंद्रसेन देशमुख यांना देण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकरी महिलांचा रेडीओ किसान लक्ष्मी पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना दांगट यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे समृध्द शेतीसाठी कृषी मूल्यवर्धीत साखळी निर्माण करण्याची गरजही व्यक्त केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या नांदूर - मधमेश्वर प्रकल्पातून रब्बी पिकाच्या दुसऱ्या आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आलं आहे. वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यातल्या १०४ गावांतल्या शेतीला यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी १ डिसेंबरला पहिलं आवर्तन सोडण्यात आलं होतं. हे आवर्तन २१ दिवस चालू राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली.

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर ३७ गावं असून या गावांना सिंचनासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पडूळ वस्ती गाढेजळगांव आणि करंजगाव हसनाबाद, तर लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या शिवणखेड  या गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात गाढेजळगावसाठी एक कोटी ८० लाख, हसनाबाद साठी एक कोटी ४१ लाख तर शिवणखेड गावासाठी २९ लाख एवढ्या रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

****

तिरुपती - नगरसोल - तिरुपती या रेल्वे गाडीच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी १३ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी परभणी, परळी, सिकंदराबाद, गुंटुर मार्गे धावेल.

नांदेड - तिरुपती - नांदेड या रेल्वे गाडीच्या, फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्ये एकूण ४२ फेऱ्या होणार आहेत.

****

लातूर जिल्हा परिषदेतल्या २६२ तुकड्यांना अवैधरित्या मंजुरी दिल्या प्रकरणी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांसह, शिक्षण संचालक, उपसंचालक तसंच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या प्रकरणी लातूरच्या निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यानं  न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मार्चला होणार आहे.

///****///

     

No comments: