Monday, 15 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीला आजपासून सुरुवात झाली. नेदरलँडमधल्या हेग इथं ही सुनावणी सुरू आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेली शिक्षा व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे. जाधव यांच्यावदबाव आणला गेला, तसंच त्यांना भारतीय राजदूताची भेट घेऊ दिली नाही, असा आरोप भारताचे वकील हरीश साळवे यांनी यावेळी केला. पाकिस्तानी लष्करानं जाधव यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं ते म्हणाले. जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी भारताकडून यावेळी करण्यात आली. याप्रकरणी पाकिस्तानचे वकील आजच आपली बाजू मांडणार आहेत.  

****

सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम धर्मातली तिहेरी तलाक पद्धत अवैध आणि असंवैधानिक ठरवल्यास, केंद्र सरकार मुस्लिम धर्मातल्या विवाह आणि घटस्फोटाचं नियमन करण्यासाठी नवीन कायदा आणेल, असं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. न्यायालयात तिहेरी तलाकवर सुरु असलेल्या सुनावणीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रोहतगी यांनी, केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांच्या मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याचं ते म्हणाले.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नद्यांच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातल्या अमरकंटक इथं आयोजित नर्मदा सेवा यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशाच्या नकाशात अनेक नद्या आहेत, मात्र त्यातल्या बऱ्याच नद्या कोरड्या पडल्या असल्याचं ते म्हणाले. नद्यांच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मध्य प्रदेश सरकारनं नर्मदा नदीच्या संरक्षणासाठी तयार केलेला दिशादर्शक आराखडा म्हणजे, एक परिपूर्ण दस्तावेज असून, हा आराखडा सर्व राज्य सरकारांना द्यावा असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.   

****

‘रॅन्समवेअर’ व्हायरसचा एटीएम मशिन्सनाही धोका असल्याचं सांगत भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना त्यांच्या एटीएम मशिनला अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी अचानक झालेल्या सायबर हल्ल्याचा १५० देशातल्या दोन लाख संगणकांना फटका बसला आहे. एटीएम मशिनचं अद्ययावतीकरण होईपर्यंत ते वापरु नये असं आरबीआयनं म्हटलं आहे. 

****

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी देशाचं संस्थात्मक तंत्र सक्षम आहे, मात्र आपत्ती नियमांचं पालन करणंही गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित आपत्ती जोखीम निवारणाच्या राष्ट्रीय व्यासपीठाच्या दुसर्या बैठकीत बोलत होते. आपत्ती निवारणांच्या उपाययोजनांमध्ये खूप मोठे बदल झाले असून, भविष्यात आपत्ती जोखीम करण्यासाठी तांत्रिक विकासाचा उपयोग केला जाईल, असं ते म्हणाले. पायाभूत सुविधा आणि विकासात्मक प्रकल्प, निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार तयार करावी, जेणेकरुन आपत्ती निवारण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असं ते म्हणाले.

****

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एनसीईआरटीनं सर्व पाठ्य पुस्तकांची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाठ्यपुस्तकं २००७ मध्ये तयार करण्यात आली होती. पाठ्यपुस्तकात कोणताही बदल करणार नसून, फक्त नवीन माहिती अद्ययावत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

देशात अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी गेल्या तीन वर्षात अनेक उपाययोजना केल्या असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतली गळती थांबवून, व्यवस्था सुधारण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये नवं तंत्रज्ञान वापरण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. सुमारे १७ कोटी ९९ लाख रेशन कार्ड आधार कार्डशी जोडले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे बनावट आणि अपात्र रेशन कार्ड आपोआपच निकाली निघतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

परळी कृषी उत्पन्न बजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलनं १८ पैकी १४ जागा जिंकून विजय मिळवला. तर पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनलला चार जागा जिंकता आल्या. बाजार समितीच्या संचालक पदासाठी काल मतदान झालं होतं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...