Saturday, 2 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –2 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  जून २०१ दुपारी १.०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापुरमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांची भेट घेतली. यावेळी परस्पर हित संबंधाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांचा आज सिंगापुर दौऱ्याचा शेवटचा दिवस असून, आज त्यांनी क्लिर्फोर्ड पायर इथं स्मृतीफलकाचं अनावरण केलं. १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या अस्थि या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या. सिंगापूरमध्ये वसलेल्या भारतीयांनी उभारलेल्या मरियम्मन मंदिर, तसंच बौध्द मंदिर आणि जामाए चौलीया मशिद याठिकाणांनाही त्यांनी भेट दिली.

****



 हेपेटाइटिस-बी या आजाराशी संबंधित रुग्णाच्या प्रसूतीशी संबंधित कार्य करणाऱ्या तसंच रुगणांना इजेक्शन्स देणाऱ्या आणि रक्तपुरवठा करणाऱ्या आरोग्य सेवकांना हेपेटाइटिस-बी विरोधी लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ज्या आरोग्य सेवकांना अशा प्रकारची लस या आधी दिलेली नाही त्या सर्वांना सुरक्षेच्या  कारणासाठी ती देणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. देशात केवळ १६ ते ६० टक्के आरोग्यसेवकांना हेपेटाइटिस-बी विरोधी लस दिली जाते, असं एका अहवालात म्हटलं आहे.

****



 भारतीय हवामान विभागानं पुढच्या दहा दिवसां पर्यंतच्या हवामानाची माहिती देण्यासाठी सामूहिक अनुमान प्रणाली - ई पी एस ही नवी यंत्रणा सुरू केली आहे. यामुळे हवामानाच्या अंदाजातल्या त्रुटी कमी व्हायला मदत मिळेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या प्रणालीसाठी ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, याद्वारे २३ किलोमीटर वजी १२ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरच्या हवामानाचा अचूक अंदाज नोंदवता येणार आहे.

****



 कावेरी नदीच्या पाणी वाटपा संदर्भातल्या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशानं, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कावेरी जल व्यवस्थापन प्रधिकरणाचीस्थापना केली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांदरम्यान कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन झालेल्या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एक योजना आखल्याचं केंद्रीय जलसंपदा मंत्रालयानं जारी केलेल्या आधिसूचनेत म्हटलं आहे. समितीच्या कामकाजाकरता केंद्र सरकार सुरुवातीला दोन कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

****



देशातलं पहिलं राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये स्थापन करण्याच्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. गेल्या २३ तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळानं या अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.  इंफाळ जिल्ह्यात कोतृक इथं सव्वा तीनशे एकरांवर स्थापन होणाऱ्या या विद्यापीठात खेळ, खेळांविषयी तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन, इत्यादी विषयांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्याशिवाय खेळांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण केंद्रही या विद्यापीठात असेल. 

****



 चालु वर्षी साखरेचं ज्यादा उत्पादन होऊन साखरेचे दर पडले तसंच ऊस उत्पादन शेतकऱ्यांनाही पुरेसा दर मिळू शकला नाही, अशी विपरीत परिस्थिती असतानाही पुढील वर्षासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्रथम पसंती दिल्याचं उघड झालं आहे. राज्याच्या कृषी खात्याचं दिलेल्या आकडेवारी नुसार, यंदा आतापर्यंत सुमारे ४८ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी यावेळेपर्यंत ४७ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली होती.

****



 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत, राज्यातल्या १५ शहरांतल्या गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरं मंजूर झाली आहेत. देशात एकूण एक लाख ५० हजार घरं मंजूर करण्यात आली आहेत. यात नांदेड आणि उस्मानाबाद या शहरांचा समावेश आहे.

****



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची फेरपरिक्षा जुलै - ऑगस्ट २०१८ मध्ये होणार आहे. या परिक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

****



 अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगडच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पाच आणि सहा जून रोजी रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पाच जून रोजी पर्यावरण दिन असल्यानं गडाची स्वच्छता आणि गडपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहा जून रोजी सकाळी महापूजा, ध्वजपूजन, यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, खासदार छत्रपती संभाजी राजे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

****



 फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचं मिश्र दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार हंगेरीची टीमिया बाबोस,  तसंच दिवीज शरण आणि त्याची जोडीदार जपानची शूको आवोयामा यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे पुरूष दुहेरी सामन्यात दिवीज आणि यूकी भांबरी या जोडीचाही  दुसऱ्या फेरीत पराभव झाला, तर रोहन बोपन्ना आणि फ्रान्सचा एदुआर्ड रॉजर वॅसलिन आज उपउपान्त्य फेरीत खेळणार आहेत.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 21 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 21 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...