Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 8 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये
आज एम करुणानिधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन
यांनी. तर राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर
दोन्ही सदनांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज सकाळी चेन्नईत द्रमुक नेते करुणानिधी यांचं अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण
केली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह
अनेक मान्यवरांनी यावेळी करुणानिधींच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं. अभिनेते रजनीकांत,
कमल हसन यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकारही यावेळी उपस्थित होते.
****
राज्यसभेच्या
उपसभापती पदासाठी विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसचे खासदार बी.के हरीप्रसाद हे उमेदवार असतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या
पदासाठीची निवडणूक उद्या होणार असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून संयुक्त जनता दलाच्या
हरिवंश नारायण सिंह, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षांमधल्या काँग्रेसव्यतिरिक्त
अन्य पक्षांनी या पदासाठी आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपला उमेदवार
हा सर्व विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार असेल, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
****
पुढील काही
दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा विकासाचा
स्त्रोत राहील, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. काल वॉशिंग्टनमध्ये जारी
केलेल्या अहवालात नाणेनिधीनं, वस्तू आणि सेवा कर ही करधोरणातली उल्लेखनीय सुधारणा असल्याचं
नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्थेच्या खरेदी क्षमतेमध्ये भारताचा पंधरा टक्के वाटा आहे,
२०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के असेल,
असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
****
ग्रामीण भागातल्या
शासकीय जागांवरची निवासी अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यानुसार
सन २००० पूर्वीची ५०० चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा लहान घरं कोणतंही शुल्क न आकारता तर,
५०० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली घरं शुल्क आकारून नियमित करण्यात येतील.
राज्यातल्या अशा सगळ्या अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या
मोबाईल ॲपचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण
ग्रामीण महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकासमंत्री
पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
****
राज्यातल्या
साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाचशे त्राण्णव कोटी रुपये थकबाकी असून,
साखर कारखान्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना चुकती करावी, यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं
राज्य साखर आयुक्तांच्या कार्यालयातल्या सूत्रांनी सांगितलं आहे. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत
कारखान्यांनी शेतकऱ्यांना वीस हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपये दिले आहेत, मात्र तरीही
पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये थकले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्याचे साखर आयुक्त
संभाजी कडू पाटील हे साखर कारखानदारांशी याबाबत चर्चा करत असून, ऊस उत्पादकांचे पैसे
देण्याबाबतचे शासनाचे नियम न पाळणाऱ्या काही साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई-गोवा
महामार्गाची दुरुस्ती येत्या पाच सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं राज्यसरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या
एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारनं हे आश्वासन दिल्यानं, गणेशोत्सवासाठी मोठ्या
संख्येनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
****
मुंबई नागपूर
समृद्धी मार्गासाठी नाशिक जिल्ह्यात निर्धारित केलेल्या जमिनीपैकी ऐंशी टक्के जमिनीचं
संपादन करण्यात आलं असून उर्वरित वीस टक्के जमिनीचं अधिग्रहण लवकरच करण्यात येणार असल्याची
माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी
आणि सिन्नर या तालुक्यांमधलं बाराशे पन्नास हेक्टर क्षेत्र समृद्धी मार्गासाठी संपादित
करण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस न झाल्यानं भर पावसाळ्यात जिल्ह्याच्या पूर्व भागातल्या
टंचाईग्रस्त गावांना एक्कावन टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातल्या जलाशयांमध्ये
साठवण क्षमतेच्या 60 टक्के इतका पाणीसाठा असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा टक्क्यांनी
कमी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment