Wednesday, 14 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र सेना दलासाठीचे १३५ शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन कीर्ती चक्र, एक वीर चक्र, १४ शौर्य पदकं आणि ११५ सेना पदकांचा समावेश आहे. राष्ट्रीय रायफलचे जवान प्रकाश जाधव आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप समादेशक हर्षपाल सिंग यांना कीर्ती चक्र, हवाई दलाचे विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांना वीर चक्र पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान ज्ञानेश्वर साबळे याला शौर्यचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०१९ चे राष्ट्रपती पोलीस पदकंही आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्टातल्या ४६ जणांचा समावेश आहे. यापैकी गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदकं प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये बीड इथले पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली, जालना इथले सहायक उपनिरीक्षक रामराव राठोड, औरंगाबाद इथले सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण, नांदेड इथले सहायक उपनिरीक्षक खामराव वानखेडे, जालना इथले जमादार अंकुश राठोड, नांदेड इथले जमादार अविनाश सातपुते, आणि पूर्णा इथले जमादार मकसूद अहमद खाँ पठाण, यांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींनी तुरुंग सेवेतल्या अधिकाऱ्यांसाठीच्या सेवा पदकाची घोषणा केली. यामध्ये राज्यातल्या सातारा जिल्हा तुरुंग विभागाचे सुभेदार शकील अल्लाउद्दीन शेख यांना वैशिष्टपूर्ण सेवेसाठी, मुंबईतल्या भायखळा तुरुंग विभागाचे शिपाई जितेंद्र काटे आणि ठाण्याचे शिपाई अशोक ठाकूर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीची पदकं घोषीत झाली आहेत.
देशातल्या ५६ जणांना अग्निशमन सेवा पुरस्कारही आज जाहीर झाले.
****
पालघरमध्ये आज हुतात्मा दिन पाळण्यात आला. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश राजवटी विरोधात 'चले जाओ' चा नारा देत पालघर मधले अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते. अनेकांना या लढ्यात हौतात्म्य आलं होतं. या हुतात्म्यांना हुतात्मा चौकावर श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
राज्यातल्या १० हजार शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधता येणाऱ्या ‘कृषी संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी त्यांनी अमरावतीसह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी सहाय्यकांशी संवाद साधला.
यावेळी खरीपाच्या काळात शेतकऱ्यांशी कसा संपर्क साधायचा या बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहू नये असे निर्देश देतानाच नव्यानं सुरु झालेल्या प्रधानमंत्री कृषी मानधन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करावी, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत.
****
परभणी इथं बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज करण्यात आलं. पाथरी इथं नवीन बसस्थानकाच्या इमारतीला मान्यता देण्यात येईल, तसंच परिवहन व्यवस्थेत आमुलाग्र बदल करून, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं रावते यावेळी म्हणाले
****
बुलडाणा जिल्हा नागरी आणि पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था महासंघ, सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातली पाच गावं पुनर्वसनासाठी घेणार आहे. महासंघाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही माहिती दिली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या गजानन महाराज संस्थानच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून यामधील अनेक गावांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी संस्थाननं घेतली आहे.
****
परभणी इथं महाविद्यालयातल्या तासिका सुरळीत चालू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावं, प्रमुख मागणीसाठी संभाजी सेनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. परभणी इथं विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय तसंच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचं गेल्या नऊ ऑगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...