Friday, 16 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१६ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****
** देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा
** लोकसंख्येच्या विस्फोटाबाबत जागरुकतेची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रा काढणार
आणि
** प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन
****
देशभरात काल सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा झाला. दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, लोकसंख्येचा विस्फोट ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून, याबाबत जागरुकतेची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देशभरात शुद्ध पेयजल पुरवठ्यासाठी जलजीवन अभियानाची घोषणा पंतप्रधानांनी केली. सुमारे साडे तीन लाख कोटी रुपये खर्चून हे अभियान राबवलं जाणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक शेतीवर भर द्यावा, नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून देश प्लास्टिकमुक्त करावा, असं आवाहन मोदी यांनी केलं. येत्या गांधी जयंतीपर्यंत स्वच्छ भारत अभियानात एक पाऊल पुढे जाता यावं, यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी देशभरातलं प्लास्टिक एकत्रीकरणाची व्यापक व्यवस्था उभारावी, असं पंतप्रधान म्हणाले.
पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून येत्या पाच वर्षात भारत पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकेल, असा विश्र्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला
सैन्य दलाच्या पायदळ, वायूदल आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा, यासाठी संरक्षण दल प्रमुख -चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ या नवीन पदाची घोषणा पंतप्रधानांनी कालच्या भाषणातून केली. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धापासून संरक्षण तज्ज्ञांकडून या पदाची शिफारस केली जात होती.
राज्यात पुणे इथं विधानभवनात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते तर मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. समुद्रात वाहून जाणारं १६७ अब्ज घनफूट पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून राज्य, जल परिपूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं सांगतानाच, येत्या काळात राज्य, दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन साजरा झाला. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. राज्याच्या काही भागात पूरपरस्थिती तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून हे सरकार या आव्हानाला सामोरं जाण्यास समर्थ असल्याचा विश्वास रावते यांनी व्यक्त केला ते म्हणाले…

महाराष्र्टात सध्या महापुराचे थैमान घातले आहे. त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या परिस्थितीत आपण त्यांच्या दुखापती संवेदना व्यक्त करणे आवश्यक आहे पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा चिंतातूर असून तोही आक्रंदन करत आहे. पावसानं मांडलेलं आहि रे आणि नाहि रे चं गणित  हे सरकार कड आव्हान आहे.  सरकार या आव्हानाला तोंड द्यायला समर्थ आहे. हा विश्वास  यानिमित्ताने मी खासकरून दुष्काळ असलेल्या मराठवाड्यातील जनतेला देत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती पी.बी वराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तर बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर  हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. आश्वासक औद्योगिकरणामुळे महाराष्ट्र हे राज्य गुंतवणुकदारांसाठी प्रथम पसंतीचं राज्य असल्याचं सावे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. दुष्काळ निवारणासाठी सरकारनं विविधउपाययोजना सुरू केल्या असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही सावे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले…. 

दुष्काळ यासाठी नियोजन सरकारने करायचा ते करण्यावरही सरकार लागले कामाला लागली आहे. आणि त्याच्यासारखा पूर्णपणे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सर्वात मंगळवारी बैठक घेऊन दुष्काळ परिस्थिती आहे याचा आढावा घेतल्यानंतर त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला सुरुवात केली त्या पद्धतीने योग्य ती योजना राबविण्यात येईल. जसा दरवर्षी गणपतीमध्ये पाऊस होतो तसा पदधतीने पाऊस नाही झाला की,योग्य ती योजना राबविण्यात येईल.

नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते, लातूर इथं बाभळगाव पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते, तर उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा छावण्या ऑगस्टअखेरपर्यंत सुरू ठेवणार असल्यानं, पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला. विभागात सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं, शैक्षणिक संस्था, राजकीय तसंच सामाजिक संघटना आणि खासगी आस्थापनांमधून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनं पोलखोल यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून २० ऑगस्ट या राजीव गांधी यांच्या जयंती दिनापासून ही यात्रा सुरू होईल,   असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काल मुंबईत सांगितलं.
महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी ही पोलखोल यात्रा काढण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सणही काल देशभरात उत्साहात साजरा झाला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा जीवन साधना पुरस्कार प्रख्यात शल्य चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दामोदर बळीराम पतंगे यांना जाहीर झाला आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी काल ही घोषणा केली. आज उस्मानाबाद उपकेंद्राच्या १५ व्या वर्धापनदिनी या पुरस्काराचं विरतण करण्यात येणार आहे.
****
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटातून तसंच ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. सलमान खान अभिनीत ‘बॉडीगार्ड’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारानं त्रस्त असलेल्या विद्या सिन्हा यांच्यावर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान काल रुग्णालयात त्यांचं निधन झालं.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडून सुमारे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेलं हे पाणी पुढच्या सुमारे तीन ते चार दिवसांत परभणी जिल्ह्यातल्या ढालेगाव प्रकल्पापर्यंत पोहोचेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून चौदाशे घनफूट प्रतिसेकंद, उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद, तर जलविद्युत प्रकल्पातून सुमारे सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक सध्या मंदावली असून, सध्या हे प्रमाण सुमारे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद एवढं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगावजवळ झालेल्या अपघातात काल दोन जणांचा मृत्यु झाला. मरण पावलेले दोघे सख्खे भाऊ परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या कमळापूरचे रहिवासी होते, ते चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरुन मुदखेड इथं जात असताना सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
****
हैदराबाद- मुंबई रेल्वे मार्गाच्या कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आजपासून २८ ऑगस्टदरम्यान काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यानुसार  कुर्ला -नांदेड -कुर्ला, कुर्ला -बीदर- कुर्ला, कोल्हापूर -बीदर -कोल्हापूर, पनवेल- नांदेड -पनवेल,  आणि परळी -मिरज -परळी या गाड्या या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई -भुवनेश्वर -मुंबई तसंच मुंबई -हैदराबाद -मुंबई या दोन गाड्या मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, विकाराबादमार्गे धावणार आहेत.
****
राज्यातल्या महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदरानं वाढीव भांडवल उपलब्ध करून देणार असल्याचं  लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. ग्राम विकास विभाग आणि लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी संयुक्तपणे भरवलेल्या हिरकणी महोत्सवात जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री स्टॉलचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
****



No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...