Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - १८ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v नागरिकांचे आरोग्यासंबंधी
प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध -राष्ट्रपतींचं प्रतिपादन
v देशभरात प्लास्टिक
बंदीसाठी कायद्याची युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची मागणी
v दूरदर्शनच्या
वरिष्ठ वृत्तनिवेदक नीलम शर्मा यांचं निधन
आणि
v
मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या
राष्ट्रीय अधिवेशनाला नांदेड इथं प्रारंभ
****
आयुष्यमान भारत आणि इतर योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे
आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी म्हटलं आहे. ते काल वर्ध्यात सेवाग्राम इथं महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या
सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते. महात्मा गांधीजींच्या जीवनातून नीतिमूल्य,
करुणा, तसंच पददलितांची सेवा आणि सन्मान करण्याची तत्वं अंगीकारण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी
विद्यार्थ्यांना केलं.
तत्पूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी सेवाग्राममध्ये
बापूकुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली.
राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी विद्यासागर राव,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. आश्रमातल्या खादी प्रकल्पाला राष्ट्रपतींनी भेट
दिली, तसंच आश्रम परिसरात वृक्षारोपणही केलं.
दरम्यान काल सायंकाळी राष्ट्रपतींनी मुंबईत राजभवन
परिसरात उभारलेल्या ‘जल किरण’ अतिथीगृहाचं
उद्घाटन तसंच ऐतिहासिक तोफांसमोर कोनशिलेचे अनावरण केलं. आज राष्ट्रपतींच्या हस्ते
राजभवनातल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन, तसंच ‘जल भूषण’ या
इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पायाभरणी होणार आहे.
****
संविधान कर्त्यांनी सामान्य माणसावर विश्वास दाखवल्यामुळे
गेल्या ७३ वर्षांत भारत एक सशक्त लोकशाही बनू शकला असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी म्हटलं आहे. प्रसाद यांच्या हस्ते काल
नागपूर इथं राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचं उद्घाटन
झालं, त्यावेळी ते बोलत होते. न्यायमूर्ती शरद बोबडे यावेळी उपस्थित
होते, देशातली ८० टक्के जनता मोफत न्यायिक सल्ल्याला पात्र
असूनही, फार कमी लोक न्यायिक मदत मागतात. या बाबतीत अजून जागृती होण्याची गरज, न्यायमूर्ती बोबडे यांनी व्यक्त केली.
****
समाजमाध्यमं अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पुरक असल्याचं
मत मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत पहिल्या मराठी सोशल
मिडिया संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत होते. माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण
करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहे. तसंच या माध्यमांमुळे जगभरातले मराठी
बांधव एका व्यासपीठावर आले आहेत, त्यांची मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे असंही
तावडे यावेळी म्हणाले.
****
कोल्हापूर आणि सांगली इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मदतीची तीन वाहनं पाठवली आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील आणि अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ही वाहनं पूरग्रस्त
भागांकडे रवाना झाली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात स्वच्छतेच्या
कामाची गती वाढवण्याचे निर्देश पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुराचं
पाणी आलेल्या भागातल्या पूररेषा खूणेची
कामं त्वरित करण्याच्या सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी
पुरामुळे बाधित झालेल्या घरांचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली असून, नेमून दिलेल्या भागातल्या घरांचं
परीक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिऱ्यांनी दिल्या.
****
सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाचा तपशीलही
हळूहळू समोर येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात सुमारे ११२ रस्त्यांचं मोठं नुकसान झालं
आहे. जिल्ह्यातल्या ४३३, तर हरिपूर या एकाच गावात २५० घरांची मोठी पडझड झाली तर, सुमारे
तीन हजार घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. हळदीच्या साठवणुकीसाठी वापरली जाणारी जमिनीतली
१०० पेवं पाण्यात बुडाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ३१० गावांच्या स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी
२ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक
यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पुरामुळे बंद असलेली मिरज - मुंबई मार्गावरची
रेल्वे वाहतूक कालपासून सुरू झाली. महालक्ष्मी, सह्याद्री, आणि कोयना एक्सप्रेस गाड्या
पुन्हा सुरू झाल्या आहेत.
****
देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करावा, अशी मागणी
युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात
पंतप्रधानांनी प्लास्टिकमुक्तीचं आवाहन केलं होतं, त्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे
आभार मानत, प्लास्टिकचं उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली. महाराष्ट्रासह
वीस राज्यांनी प्लास्टिक बंदी लागू केली आहे, याकडेही आदित्य यांनी लक्ष वेधलं. एकदाच
वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदीमुळे, कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त
केला.
****
जम्मू आणि काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नियंत्रण
रेषेजवळ भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी भागात गोळीबार करत, पाकिस्ताननं काल पुन्हा
एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यात एक सैनिक हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे. भारतीय
सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं, यात पाकिस्तानच्या काही चौक्या उध्वस्त
झाल्या तर काही सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
दूरदर्शनच्या वरिष्ठ वृत्तनिवेदक नीलम शर्मा यांचं
काल निधन झालं. त्या ५० वर्षांच्या होत्या. दूरदर्शनमध्ये गेली २५ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदक
तसंच सूत्रसंचालक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेजस्वीनी, बडीचर्चा यासारखे त्यांचे
कार्यक्रम गाजले. केंद्र सरकारच्या नारी शक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना
सन्मानित करण्यात आलं होतं. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
कोल्हापूरमधून पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा काल
रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. यात दोन तरुणी
आणि एका तरुणाचा समावेश आहे. मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे तिघे कोल्हापूरमध्ये
कसबा बावडा इथं राहत होते. त्यांच्या सोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा
रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे.
****
अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर जीप आणि ट्रक यांच्यात
झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात
झाला, अपघातात मयत झालेले दोघे जालन्याचे रहिवासी होते.
****
पैठण इथं काल एक शाळकरी मुलगा गोदावरी नदीत वाहून
गेला. जायकवाडी धरणातून सध्या नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. हे पाणी पाहण्यासाठी
गेलेली दोन मुलं पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता, एक जण वाहून गेला, तर दुसऱ्याला वाचवण्यात
स्थानिकांना यश आलं.
****
हिंगोली इथल्या कयाधू शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश
वसेकर यांचं काल निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. काल सायंकाळी हिंगोली इथं त्यांच्या
पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात प्रवेश देणं
योग्य नसल्याचं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. काल
एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना, त्यांनी हे मत नोंदवलं. पक्षानं उमेदवारी
दिल्यास, मुक्ताईनगर मतदार संघातूच विधानसभेची निवडणूक लढवू, असं खडसे यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय मराठा पार्टीनं राज्य विधानसभेच्या सर्व
दोनशे ८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते ललित अहिरे पाटील
यांनी काल याबाबत पत्रक जारी केलं. मराठा क्रांती मोर्चामध्ये बलिदान दिलेल्या दिवंगत
कार्यकर्त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना, निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं
जाणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचवण्यात
आणि समाज प्रबोधानात माध्यमाचं योगदान महत्त्वाचं आहे, असं राज्यमंत्री अर्जून
खोतकर यांनी म्हटलं आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला
काल नांदेड इथं प्रारंभ झाला, या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे
म्हणून खोतकर बोलत होते. मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांच्या
हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. माध्यमांनी वार्तांकन करतांना सत्यता पडताळून
लिखाण करण्याचं आवाहनही खोतकर यांनी केलं. पी साईनाथ यांनी
आपल्या उद्घाटनपर भाषणातून पीक विमा
योजनांचा खासगी कंपन्या आणि बँकांनाच फायदा होतो, असं मत व्यक्त केलं. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार
निवृत्त न्यायमूर्ती नरेंद चपळगावकर यांना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या
हस्ते आज प्रदान करण्यात येणार आहे. औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ.ना.गो. नांदापूरकर
सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे माजी नगरसेवक, काँग्रेस
कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर काल सायंकाळी दोन अज्ञात इसमानी गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोकुलवार यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून त्यांना
मुंबईला हलवण्यात आलं आहे.
****
बीड तालुक्यात, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामं तसंच रस्ते सुधारणा कामांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन
मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला.
****
दिव्यांग ॲथलीट दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया
यांना सर्वोच्च क्रीडा सन्मान - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकन देण्यात
आलं आहे. निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड केली, यात क्रिकेटपटू
रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांचा समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment