Monday, 21 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.10.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
**  विधानसभा निवडणुकीचं मतदाशांततेत सुरू; मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त  
** राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस; कापसाचं तसंच काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
** मल्ल- भारत केसरी, दादू चौगुले यांचं निधन
आणि
** भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात दोन बाद नऊ धावा
****
राज्य विधानसभेच्या २८८ जागा आणि सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरू झालं आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान सुरु राहणार आहे. राज्यात एकूण आठ कोटी ९३ लाख ३९ हजार सहाशे मतदार या निवडणुकीत मतदान करतील. यात चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ महिला, तीन लाख ९६ हजार दिव्यांग, तर दोन हजार ६३४ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रं असून, खास महिलांकडून संचलित केली जाणारी ३५२ सखी मतदान केंद्र आहेत.
आजच्या मतदानानं तीन हजार २३७ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. 
ही संपूर्ण मतदान प्रक्रिया शांतता आणि सुरळीत पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून दोन लाख पोलिस कर्मचाऱ्यांसह अर्धसैनिक बलाच्या ३५० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य गृहरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अर्धसैनिक बलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेटचा उपयोग केला जात आहे. जिथे तात्पुरत्या स्वरूपातल्या मंडपांमध्ये मतदान होआहे अशा ठिकाणी अग्निशमनची व्यवस्थाही केली गेली आहे. ठिकठिकाणी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हिलचेअर तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था केली गेली आहे.
****
मराठवाडा विभागात एकूण ४६ विधानसभा मतदारसंघ असून, एक हजार २६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
परभणी जिल्ह्यात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे चार विधानसभा मतदार संघ असून, ५६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं.

लातूर जिल्ह्यात एकूण दोन हजार १३ मतदान केंद्र असून, मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनानं ९६ टक्के मतदारापर्यंत मतदान पावत्यांचं वाटप केल असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात एकूण एक हजार एक मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघातल्या एक हजार ६५३ मतदान केंद्रांवर १५ लाख ५७ हजार २८३ मतदार मतदनाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यात दोन हजार ६५२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पाच ठिकाणी सखी मतदान केंद्राची, तर पाच ठिकाणी आदर्श मतदान केंद्राची स्थापना प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदार संघात एक हजार ४९४ मतदान केंद्रावर १३ लाख १४ हजार २४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन कालपासूनच फिरत्या पथकांद्वारे या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ४६ हजार २४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ९६२ मतदान केंद्रं उभारण्यात आली असून, १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 
मतदारांनी मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, असं परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सांगितलं.  
****
विधानसभा निवडणुकीच्या आज होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटवण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचं मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेलं बँकांचं/टपाल कार्यालयाचं पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेलं स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेलं निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र, यापैकी कोणताही एका पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणं आवश्यक आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****
राज्यात कालही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तसंच वेचणीला आलेल्या कापसाचं मोठं नुकसान झालं. या शिवाय मका आणि अन्य काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांनाही याचा फटका बसला. राज्यातल्या सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यापावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा वाढला असून धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. मराठवाड्यातही काल बहुतांशी जिल्ह्यात काल पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. परभणी जिल्ह्यातल्या नऊ आणि जालना जिल्ह्यातल्या सहा मंडळांमध्ये गेल्या दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाचं एवढा मोठा पाऊस झाला असून भोगावती नदी पाण्यानं भरून वाहू लागली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातले पन्नास टक्के बंधारे भरले आहेत. लातूर शहराला उपयोगी पडणाऱ्या नागझरी बंधार्यात पन्नास टक्के पाणीसाठा झाल्यामुळे लातूरमध्ये होणारा टॅंकरचा फेरा लांबणीवर गेला आहे. तेरणा प्रकल्पातही २० दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे. मांजरा, तेरणा तसंच बंधाऱ्यांमध्ये साठलेलं पाणी लक्षात घेता डिसेंबर पर्यंत लातूर शहराला नळाव्दारे पाणी पुरवठा करता येउ शकतो, असं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उद्यापर्यंत, राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विशेषत: बीड आणि उस्मानाबादसह अनेक ठिकाणी या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
राष्ट्रीय विकासात विधी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बंगळुरूच्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात काल ‘राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी न्यायपालिकेचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन उत्तम न्यायाधीश, वकील, शिक्षक बनून सामाजिक सेवेस प्राधान्य द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर.एम.बोर्डे यांचा सेवागौरवही करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती बोर्डे यांनी, राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करताना सर्वांचंच मोलाचं सहकार्य लाभलं, त्यामुळेच मोठी जबाबदारी पार पाडता आली, असं मत व्यक्त केलं.
****
मल्ल भारत केसरी दादू चौगुले यांचं काल दुपारी कोल्हापूरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचार सुरू असताना ते कोमात गेले. तिथंच त्यांचं निधन झालं. न्यूझीलंडमधे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं होतं.
****
मुंबईनजिक कर्जत जवळ रेल्वे पटरीच्या कामामुळे नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी २६ ऑक्टोबरला, तर २७ तारखेची पनवेल ते नांदेड ही विशेष गाडी रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात दोन बाद नऊ धावा झाल्या. चहापानानंतर लगेचच अंधुक प्रकाशामुळे कालच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.  तत्पूर्वी भारतानं नऊ बाद ४९७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. रोहीत शर्मानं २१२, अजिंक्य रहाणेनं ११५, रविंद्र जडेजानं ५१ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.  
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या वाघदरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शंकर चाटे आणि डोंगरगांव प्राथमिक शाळेचे सहशिक्षक सिताराम लटपटे यांना लाच घेतल्याप्रकरणी तीन वर्ष तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांना शालेय पोषण आहाराचं बील मंजूर करून धनादेश देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आलं.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...