Saturday, 19 October 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.10.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****
विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सगळीकडे पक्षाच्या नेत्यांच्या सभा, प्रचारफेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध पक्षाच्या उमेदवारांनी मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन केलं.

औरंगाबादमधे आज शेवटच्या दिवशी रिमझिम पावसात उमेदवारांनी वाहन रॅली, पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पूर्वचे अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी आपापल्या मतदारसंघात वाहन फेरी काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्यचे महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही पदयात्रा काढली. एमआयएमचे असुदोद्दीन ओवेसी यांनी शहरातल्या विविध भागात पदयात्रा काढून कटकट गेट परिसरात सभा घेतली.

लातूरमध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या मिरवणुकीत बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर सहभागी झाले होते. कॉंग्रेस पक्षाच्या रॅलीत अभिनेते रितेश देशमुख सहभागी झाले होते. निलंग्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांच्या रॅलीतही घटक पक्षाचे नेते सहभागी झाले होते.

अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही मतदार संघात सत्ता परिवर्तन करणारे क्रांतीकारक होऊन गेले असून आताही ते सत्ता परिवर्तन करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अंबाजोगाई इथं महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.  

भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आमदार संतोष दानवे यांच्या प्रचारार्थ भोकरदन मतदारसंघात कार्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी मतदार संघातल्या ग्रामीण भागात प्रचार दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तर कैलास गोरंट्याल यांनीही कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. राजेश टोपे यांनीही घनसावंगी मतदार संघात प्रचारसभा घेतली.

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथं भाजपाचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सभा झाली. राज्याच्या या निवडणुकीत ३७० कलमचा मुद्दा धरुन टिका करण्याच्या विरोधकांच्या वृत्तीचा त्यांनी यावेळी निषेध केला.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे यांनी सभा घेतल्या. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राम शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जत इथं सभेला संबोधित केलं. तर रोहित पवार यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं श्रीरामपूरचे आघाडीचे उमेदवार लहु कानडे आणि शिर्डीचे सुरेश थोरात यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत बेलापूर, ऐरोली आणि ठाण्यामध्ये सभा घेतल्या.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचार गाडीला अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली. तसंच वाहन चालकाला दमदाटी करण्यात आल्याचं चालकांनी सांगितलं. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केला असल्याचा आरोप शिवसेना पक्षानं केला आहे.
नांदेड-हिंगोली मार्गावर हिवरा पाटी इथं आचारसंहिता तपासणी पथकानं दोन लाख ३३ हजार १५९ रुपये किमतीचा दारुचा साठा आज जप्त केला. जवळपास १०० खोके भरुन हा साठा नांदेडहून माहूर इथं नेला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हा माल वाहतूक करत असताना आढळून आल्यामुळे तपासणी पथकाने तो माल ताब्यात घेतला आहे.
****
लोकसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पपत्रांचा विक्रम करणाऱ्या अहमदनगर जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही पुन्हा या विक्रमाला गवसणी घातली आहे. या उपक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे तेरणा, मांजरा या प्रमुख मोठ्या नद्यांमधून यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी वाहात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास आणि जनावरांना चारा मिळण्यास मदत होणार आहे. रब्बी हंगामातल्या पिकांच्या पेरण्यांना हा पाऊस उपयुक्त आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...