Sunday, 20 October 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.10.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २० ऑक्टोबर २०१सकाळी ७.१० मि.
****
·      सभा, पदयात्रा आणि मिरवणुकीसह शक्ती प्रदर्शनानं विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला.
·      निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
·      राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात; औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये रात्रभर पाऊस.
आणि
·      दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात तीन बाद २२४ धावा.
****
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणुकीचा गेला महिनाभर सुरु असलेला राजकीय प्रचार काल थांबला. उद्या या निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काल सर्वच राष्ट्रीय तसंच स्थानिक छोट्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सभा, प्रचार फेऱ्या, तसंच पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला. काही ठिकाणी पावसामुळे उघड्या मैदानात असलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं प्रचार सभा घेतली. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तसंच शिर्डी मतदार संघातल्या प्रचार सभा घेतल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रायगड, माणगाव आणि उरण इथं प्रचारसभेला संबोधित केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बेलापूर, ऐरोली आणि ठाण्यामध्ये सभा घेतल्या.
औरंगाबाद इथं काल शेवटच्या दिवशी रिमझिम पावसात उमेदवारांनी वाहन फेरी, पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पूर्व मतदार संघातले उमेदवार अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले उमेदवार संजय शिरसाट यांनी आपापल्या मतदारसंघात वाहन फेरीनं प्रचाराचा समारोप केला. औरंगाबाद मध्यचे महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही पदयात्रा काढली होती. एमआयएमचे असदोद्दीन ओवेसी यांनी शहरातल्या विविध भागात पदयात्रा काढून कटकट गेट परिसरात सभेला संबोधित केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ विविध भागात कोपरा सभा आणि पदयात्रा घेण्यात आल्या.
लातूरमध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या मिरवणुकीत बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर सहभागी झाले होते. कॉंग्रेस पक्षाच्या प्रचार फेरीत अभिनते रितेश देशमुख सहभागी झाले होते. निलंग्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचार फेरीतून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांनीही रॅली काढली होती.
औसा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी काढलेल्या फेरीत सिने अभिनेत्यांनी सहभाग घेतला होता.
भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन मतदार संघात कोपरा बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. जालना मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी ग्रामीण भागात प्रचार दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. महाआघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनीही कोपरा बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. घनसावंगी मतदार संघातले महाआघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनीही मतदार संघात प्रचारसभा घेतली.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर - सेलू मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली.
परभणी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघात प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही शक्तीप्रदर्शन करत प्रचार फेरी काढून निवडणूक प्रचाराची सांगता केली. शेवटच्या दिवशी झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर याठिकाणी एकच गर्दी झाली होती. सर्व ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वदूर पाऊस असतानाही उमेदवारांनी सभा, पदयात्रा, रॅली काढून जोरदार प्रचार केला. उमरगा, परंडा, उस्मानाबाद तसंच तुळजापूर मतदार संघात सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार सभा तसंच पदयात्रांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचार गाडीला अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहन चालकाला दमदाटी करण्यात आल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असल्याचा आरोप शिवसेना पक्षानं केला आहे.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार योगेन्द्र राजेंद्र गोडे यांच्या फलकावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपा नेते आमदार एकनाथ खडसे यांचे फोटो विनापरवानगी लावल्याचं आढळून आलं, या प्रकरणी गोडे यांच्या पाच प्रकाशकांविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी काल केज तालुक्यातल्या विडा इथं झालेल्या सभेत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल असंवैधानिक भाषेत केलेल्या वक्तव्यावर धनंजय मचुपे यांच्याविरुद्ध परळी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
****
दरम्यान, परळी इथं काल शेवटच्या प्रचार सभेत भाषणानंतर पंकजा मुंडे यांना भोवळ आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाब अचानक कमी झाल्यानं त्यांना भोवळ आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 
****
उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावं या करता जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्यात आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदार असून, शहाण्णव हजार सहाशे एकसष्ट मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत.  यापैकी महिलांकडून संनियंत्रण होणारी तीनशे बावन्न ‘सखी मतदान केंद्रं’ तर दिव्यांगांद्वारे संनियंत्रित होणारी एकशे सहा मतदान केंद्रं आहेत. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून सुलभपणे मतदान करता यावं, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिले आहेत. यासाठी शाळा, महाविद्यालयातले राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, नेहरू युवा केंद्र, तसंच स्काऊट गाईडच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. खासगी कार्यालयं, आस्थापना, दुकानं, कारखाने आणि अन्य ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसंच कामगारांना मतदान करता यावं, यासाठी भरपगारी सुट्टी किंवा कामाच्या वेळेत सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
****
मतदारांनी मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ही माहिती दिली. गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदानानंतर मतदार सेल्फी काढत असल्याचं, तसंच हे छायाचित्र सामाजिक संपर्क माध्यमांवर प्रसारित करत असल्याचं निदर्शनास आलं, यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होतो. हा गंभीर गुन्हा असल्याने, यंदा मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल किंवा इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरण बाळगता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे. नांदेड तालुक्यातल्या वाघी इथं जिल्हा परिषद शाळेच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी सुमारे दोनशे पर्यावरणपुरक आकाश कंदील तयार करून, घरोघरी मतदानाचा संदेश दिला. काल जिल्हाधिकारी कार्यालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उस्मानाबाद इथं काल मतदार जनजागरण समितीच्या वतीनं रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं, तसंच ठिकठिकाणी मतदारांना माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या.
****
राज्यभरात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. औरंगाबाद शहरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड शहरात पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता. या पावसानं कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड शहरातही विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात परवापासून सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे तेरणा, मांजरा या प्रमुख मोठ्या नद्यांमधून यावर्षी पहिल्यांदाच पाणी वाहात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास आणि जनावरांना चारा मिळण्यास मदत होणार आहे.
नाशिक शहरातही काल दिवसभर जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबई उपनगर, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही काल पाऊस झाला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान रांची इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं तीन बाद २२४ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं सुरुवात डळमळीत झाली, पण रोहित शर्मा आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जोडीनं डाव सावरला. कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद २२४ धावा झाल्या असून, रोहित शर्मा ११७ तर अजिंक्य राहणे ८३ धावांवर होते.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...