आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑक्टोबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
उद्या
होत असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक
मतदान व्हावं, या करता जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्यात आठ कोटी
अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदार असून, शहाण्णव हजार सहाशे एकसष्ट मतदान
केंद्रं उभारली गेली आहेत. यापैकी महिलांकडून संनियंत्रण होणारी तीनशे बावन्न ‘सखी
मतदान केंद्रं’, तर दिव्यांगांद्वारे संनियंत्रित होणारी एकशे सहा मतदान केंद्रं आहेत.
वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून सुलभपणे मतदान करता यावं,
यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक
अधिकारी कार्यालयानं दिले आहेत.
****
दरम्यान,
विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणुकीचा गेला महिनाभर सुरु असलेला राजकीय प्रचार
काल थांबला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काल सर्वच राष्ट्रीय, तसंच स्थानिक राजकीय
पक्षांच्या नेत्यांनी सभा, प्रचार फेऱ्या, तसंच पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन करण्यावर
भर दिला. काही ठिकाणी पावसामुळे उघड्या मैदानात असलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागल्या.
औरंगाबाद
इथं काल शेवटच्या दिवशी रिमझिम पावसात उमेदवारांनी वाहन फेरी, पदयात्रा काढून प्रचाराची
सांगता केली.
****
बीड जिल्ह्यातल्या
परळी विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर, महायुतीच्या
उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावरून परळी पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल झाला आहे. मात्र, आपल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप अर्धवट प्रसारित करण्यात आली असून,
तिची तपासणी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
****
राज्यभरात
कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे.
औरंगाबाद शहरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड शहरात पहाटेपर्यंत
पाऊस सुरु होता. या पावसानं कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड
शहरातही विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात परवापासून सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे तेरणा, मांजरा या प्रमुख मोठ्या
नद्यांमधून यावर्षी पहिल्यांदाच पाणी वाहात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न सुटण्यास आणि जनावरांना चारा मिळण्यास मदत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment