Tuesday, 22 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ मार्च २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

आजपासून देशात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या प्रतिलीटर ८४ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडर ९४९ रुपये ५० पैसे या किमतीत मिळणार आहे.

****

आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवरील जल संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आणि “२०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता” हा यामागचा हेतू आहे. “आटलेल्या भूजलाचं पुनरुज्जीवन” ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे. 

****

जम्मू आणि काश्मीर मधल्या बडगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली, तर पुलवामा जिल्ह्यातही झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक फेरीवाला जखमी झाला. सुरक्षा दलांनी संबंधित परिसराची नाकेबंदी केली आहे.    

****

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत साडेपाचशे लाभार्थ्यांना उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या हस्ते काल कार्यारंभ आदेशाचं वाटप करण्यात आलं. लाभार्थ्यांनी विहीत अर्जाद्वारे कामांची छायाचित्रं सादर करावीत, हप्त्यांसाठी कार्यालयात संपर्क करावा, अशी सूचना केली.

****

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित समारंभात जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना पोलीस दलातल्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कुरुंदा-सिंदगी-बोल्डा रस्त्यावर सिंदगी शिवारात दोन मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मारोती अडकीनेन असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो वसमत तालुक्यातील इंजनगाव इथला रसीवासी आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...