आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ मार्च २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशाच्या
स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांचा आज स्मृतिदिन.
त्यानिमित्त आज देशभरात शहीद दिवस पाळण्यात येत आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन केलं आहे. या तीन महान
क्रांतीकारकांचं बलिदान देशवासियांना नेहमीच प्रेरीत करत राहील, असं पंतप्रधानांनी
ट्विट संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी मंत्रालयात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
शहीद
दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
उत्तराखंडचे
मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंग धामी यांचा शपथविधी सोहोळा आज होणार आहे. देहरादून
इथल्या परेड मैदानावर दुपारी अडीच वाजता धामी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील ११ नवनियुक्त
सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित
राहणार आहेत.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
प्रत्येकी ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं आता पेट्रोल ११२ रुपये ४८
पैसे प्रती लिटर, तर डिझेल ९६ रुपये ६५ पैसे प्रती लिटर दराने मिळणार आहे.
****
पैठणच्या
नाथषष्ठी सोहळ्याची यात्रा आजपासून सुरु झाली. नाथ षष्ठीची परंपरा असलेला संत एकनाथ
महाराज यांच्या गावातल्या वाडा मंदीरातला नाथांचा रांजण श्रीराम गुरु सळजोशी यांच्या
हस्ते काल भरण्यात आला.
****
महाराष्ट्र
विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषद गटनेतेपदी आमदार अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोद
पदी आमदार अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे
नाईक निंबाळकर यांनी काल सभागृहात ही घोषणा केली. अमरनाथ राजूरकर हे नांदेड स्थानिक
स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत वंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व
करतात.
****
No comments:
Post a Comment