Tuesday, 23 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंध हे परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिडनी इथं प्रतिपादन

·      दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आजपासून देशभरातल्या बँकांमध्ये सुरू.

·      लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परिक्षांचे निकाल घोषित, महाराष्ट्रातून करिश्मा संखे प्रथम.

·      पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाची मान्यता.

आणि

·      ड्रेनेज सफाईसाठी औरंगाबाद महानगरपालिकेचा रोबोटिक यंत्र वापरण्याचा निर्णय.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संबंध हे परस्पर विश्वास आणि आदरावर आधारलेले असून यामध्ये ऑस्ट्रेलियातल्या भारतीय समुदायाचं मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपल्या ऑस्ट्रेलिया भेटीत ते आज ऑस्ट्रेलियातल्या भारतीय समुदायाशी बोलत होते. मोठं भौगोलिक अंतर आणि भिन्न जीवनशैली असूनही योग आणि क्रिकेट अशा बाबींनी या दोन देशांतल्या लोकांना जोडून ठेवलं आहे, असं ते म्हणाले. गेल्या नऊ वर्षांत भारतानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बन शहरात भारताचा नवा वाणिज्य दूतावास सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिडनी इथं झालेल्या या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. सिडनीच्या एका उपनगरी भागाला ‘लिटल इंडिया’ हे नाव देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

****

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आज देशभरातल्या बँकांमध्ये सुरू झालं. बदलल्या जाणाऱ्या नोटांचा दैनंदिन हिशोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.

****

लोकसेवा आयोगानं २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल आज घोषित केले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.

या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत.

****

लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

****

खोकल्यासाठीची द्रव औषधं, अर्थात कफ सिरपच्या निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी घेण्याआधी, त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक आहे, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. येत्या एक जूनपासून प्रयोगशाळांकडून तपासणी आणि विश्लेषण प्रमाणपत्र मिळाल्यावरच कफ सिरपच्या निर्यातीला निर्यातदारांना परवानगी दिली जाईल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक आज मुंबईत सुरू झाली. या बैठकीचा उद्देश सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करणे आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभाव कमी करणे हा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

****

पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला आज शासनानं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करावं, म्हणजे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागानं तातडीनं १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेला वितरीत करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवणार असल्याची माहिती सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालखी मार्गावर गेल्या वर्षी दहा हजार वृक्ष लागवड केली होती, यावर्षीही तशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मार्गावर जागोजागी प्लॅस्टिक संकलन केंद्रं उभारणार असल्याची, तसंच महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्हज’ या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. हा उत्सव म्हणजे आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृती, तसंच स्वातंत्र्यलढा आणि त्यातले शूरवीर, यांना समर्पित केलेली मोहीम आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

ड्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर आज या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार अभियंता युवकांनी जेनरोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.

शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी आज मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.

****

इचलकरंजी शहरातील कबनूर इथल्या आमीन फटाका गोदामात आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात गोदामाचे मालक परवेज मुजावर यांचा मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.

****

 

नंदुरबार जिल्ह्यातल्या चांदशैली घाटात पिकअप वाहन उलटून तीन जण ठार झाले, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. पिकअप वाहन तळोद्यावरुन धडगावकडे जाताना आज सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ आज सकाळी सातच्या सुमारास झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत.

****

खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. संकेत बम्हणावत आणि आयुष नागलोद अशी मृत युवकांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...