Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज निधन
झालं, ते ८१ वर्षांचे होते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार सुरु होते. शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे
संस्थापक आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री
होते. मात्र चिरुडीह हत्याकांडात त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून
सुरु होत आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या
बुधवारी आपला निर्णय जाहीर करेल. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला
चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यता आहे, असं भारतीय स्टेट बँकेनं आपल्या अहवालात
म्हटलं आहे.
****
भारताच्या स्मार्ट फोन निर्यातीनं चालू आर्थिक वर्षाच्या
पहिल्या तिमाहीत उच्चांक गाठला आहे. जून अखेर भारताची स्मार्ट फोन निर्यात ७७२ कोटी
डॉलर्सची झाली असून, ती गेल्या वर्षी याच काळात झालेल्या निर्यातीपेक्षा ५८ टक्क्यांनी जास्त आहे.
२०२० मध्ये सुरु झालेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे स्थानिक उत्पादकांना
मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाल्यानं निर्यातीत ही वाढ झाल्याचं मानलं जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बिहारमध्ये मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण
या मुद्द्यावरुन संसदेत विरोधी पक्ष कामकाज होऊ देत नसल्याबद्दल या भेटीत चर्चा झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रपती
भवनाच्या समाजमाध्यम खात्यावर ही माहिती देण्यात आली.
****
देशात मालवाहतुकीवरचा खर्च पूर्वी १६ टक्के होता. तो
चांगल्या रस्त्यांमुळे आता दहा टक्क्यांवर आला आहे आणि भविष्यात तो नऊ टक्क्यांवर आणण्याचा
आपला प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
सांगितलं. भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन काल नागपुर इथे बोलत होते.
****
महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून, तंत्र कौशल्याच्या बळावर हा विभाग
अधिकाधिक सक्षम आणि लोकस्नेही करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल नागपूर इथं सांगितलं. भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आय आय एम नागपूर इथं
आयोजित महसूल परिषदेच्या चर्चासत्रात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख
उपस्थितीत या दोन दिवसांच्या परिषदेचा काल समारोप झाला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह महसूल विभागाशी संबंधित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
****
अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथं शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं
भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा
दर्जा दिल्यामुळे हा व्यवसाय आज प्राधान्याचं क्षेत्र झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार आपल्या नद्या आणि तलावांचा वापर करून देशात नीलक्रांती
करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हर घर तिरंगा’ या
राष्ट्रप्रेम आणि एकतेचं प्रतीक असलेल्या उपक्रमात राज्यातल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे
सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे.
दोन ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान, प्रत्येक घर, संस्था आणि आस्थापनावर तिरंगा फडकवून देशप्रेम व्यक्त करण्याचा हा उपक्रम संपूर्ण
देशभरात राबवला जात आहे.
****
राज्यात कुठेही अवैध डान्सबार चालू असल्यास ते सहन केलं
जाणार नाही, असं गृहराज्यमंत्री पंकज
भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते. नवी मुंबईतील
डान्सबार तोडफोड प्रकरणी प्रतिक्रिया देताना, कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही आणि दोषींवर कडक
कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात पेडगाव इथल्या महावितरणच्या उपकेंद्रामध्ये
नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त उर्जा रोहित्र आणि क्षमतावाढ केलेल्या उर्जा रोहित्राचं
लोकार्पण काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. विविध योजनांच्या माध्यमातून
सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देत असून, शेतकरी आणि नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्याचं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जळगाव इथं झालेल्या महाराष्ट्र कनिष्ठ मुष्टियुद्ध स्पर्धेत
छत्रपती संभाजीनगरच्या ओवी अदवंत हिने सुवर्णपदक पटकावलं. ती येत्या सात ते १३ ऑगस्ट
दरम्यान नोएडा इथं होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचं
प्रतिनिधित्व करणार आहे.
****
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता
असून, विदर्भ आणि मराठवाड्यात
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment