Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
कृषीक्षेत्रातल्या आमुलाग्र बदलांचे परिणाम काही वर्षांत
दिसून येतील-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त-सौर कृषीपंप योजनेच्या विश्वविक्रमाचं
प्रमाणपत्र प्रदान
·
राज्य सरकारच्या वर्षभरातल्या कामाची हिवाळी अधिवेशनात
श्वेतपत्रिका काढावी-काँग्रेसची मागणी
·
विमान सेवेबाबत कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक
संचालनालयाकडून तत्काळ प्रभावाने स्थगित
·
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात-जीडीपी
वृद्धी तसंच महागाई दरातही सुधारणा
·
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त
अभिवादन
आणि
·
एमजीएम विद्यापीठाचे मराठवाडा भूषण पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान
****
राज्य सरकार
कृषीक्षेत्रात आमुलाग्र बदल करत असून, येत्या काही वर्षांत त्याचे परिणाम दिसून
येतील, असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या
विश्वविक्रमाचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. या विश्वविक्रमात मराठवाड्याचं
विशेषत: छत्रपती संभाजीनगरचं लक्षणीय योगदान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
ते म्हणाले…
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महावितरणने
एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप स्थापन करण्याचा विश्वविक्रम केला, यासाठीचं
प्रमाणपत्र तसंच गौरवपदकं गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
प्रदान केलं, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, महावितरणचे व्यवस्थापकीय
संचालक लोकेश चंद्र यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्याच्या
विविध क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवल्याचं
प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं भाजप कार्यालयात
झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याने प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड
स्थापित केल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.
****
राज्य सरकारनं
येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या एक वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी
बोलत होते. विधान सभा आणि विधान परिषदेत अद्याप
विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडेही त्यांनी
लक्ष वेधलं.
****
गोदावरी
नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या आदेशांचं पालन
न केल्याबद्दल उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणी
दरम्यान न्यायालयाने यासंबंधी सर्व शासकीय यंत्रणांना आपले उत्तर देण्याची नोटीस बजावली
आहे. एका पर्यावरण कार्यकर्त्याने दाखल केलेल्या या याचिकेवर पुढची सुनावणी १८ डिसेंबरला
होणार आहे.
****
राज्यात
२ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच
होईल, त्याआधी नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६
पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
विमान सेवेबाबतचा
कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं तत्काळ प्रभावाने स्थगित केला आहे.
विमान कर्मचाऱ्यांनी घेतलेली आजारपणाची किंवा विशेषाधिकार रजा, त्यांच्या
अनिवार्य साप्ताहिक विश्रांतीत ग्राह्य धरण्यास
मनाई करणारा नियमही मागे घेण्यात आला आहे. यामुळे इंडिगो कंपनीची विस्कळीत झालेली
विमानसेवा लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी केंद्र
सरकारनं एक उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन केली आहे.
****
वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या
उमीद या पोर्टलवर एक लाख ५१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे, केंद्रीय
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना
ही माहिती दिली. आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत नोंदणी
करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार
नाही, असं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं.
****
राज्यातल्या
वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात एका बैठकीत बोलत होते. वाळू धोरणात घरकुल
बांधणीसाठी देण्यात येणारी कार्यवाही गतीने करण्याच्या सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या.
या लिलावासाठी पर्यावरण आणि महसूल विभागाने परस्पर सामंजस्य पध्दतीने काम करावं, असं त्यांनी
सांगितलं.
****
रिझर्व्ह
बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच
टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण
आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली. बँकेनं आपला सकल देशांतर्गत उत्पन्न-जीडीपी
वाढीचा अंदाज आधीच्या सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून वाढवून सात पूर्णाक तीन टक्के तर
महागाईचा अंदाज दोन पूर्णांक सहा टक्क्यांवरून दोन टक्के केला आहे.
****
भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या स्मृतिदिनी आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात
येत आहे. मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या
अनुयायांचा महासागर लोटला आहे. चैत्यभूमीतल्या आदरांजली कार्यक्रमाचं मोठ्या पडद्यांवर, तसंच मुंबई
महानगरपालिकेच्या विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. अनुयायांच्या
सोयीसाठी अतिरीक्त लोकल आणि विशेष गाड्याही चालवल्या जात आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत चेंबूरमध्ये आंबेडकर उद्यानात 'अखंड भीमज्योत' प्रज्वलित करण्यात आली.
****
शिल्पस्थापत्यातून
समाजातली स्थित्यंतरं स्पष्टपणे रेखाटली असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक
डॉ प्रभाकर देव यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं एमजीएम विद्यापीठाचा मराठवाडा
भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलतांना डॉ देव यांनी शिल्पकलेच्या या पैलूकडे लक्ष
वेधलं. ते म्हणाले…
बाईट – डॉ प्रभाकर देव
भारतीय
कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ भालचंद्र कांगो यांनाही
या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्य लोकसेवा
आयोगाच्या २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आयोगाचे अपर सचिव आर पी ओतारी यांनी ही माहिती दिली. संबंधित
स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी याची नोंद घेण्याचं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे.
****
चालू रब्बी
हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पीक
विम्याबाबत जागरूकता वाढावी आणि योजनेत सहभाग वाढावा यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत
दहावा "पीक विमा सप्ताह" राबवण्यात येत आहे. यानंतरही संपूर्ण डिसेंबर महिनाभर
विमा नोंदणी मोहीम सुरू राहणार आहे, शेतकऱ्यांनी या योजनेत अधिकाधिक सहभाग
नोंदवावा, असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी
केलं आहे.
****
जालना एटीएस
पथक आणि अंबड पोलिसंनी अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवारातून सुमारे एक कोटी रुपयांचा
चार क्विंटल गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोध
कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्य प्राथमिक
आणि माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी काल राज्यभर आंदोलन
करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीसह
बहुतांश ठिकाणी शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या
मागण्यांचं निवेदन या संघटनांच्यावतीनं शासनाकडे सादर करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन परवा सोमवारी करण्यात आलं आहे. तर १३ डिसेंबर रोजी बीड
जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment