Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 9 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेच्या उपसभापतिपदी संयुक्त जनता दलाचे हरिवंश
नारायण सिंह यांची निवड झाली आहे. या पदासाठी आज झालेल्या मतदानात हरिवंश यांना १२५
मतं, तर विरोधी पक्षाचे उमेदवार बी के हरिप्रसाद यांना १०५ मतं मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते गुलाम
नबी आझाद यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी हरिवंश नारायण सिंह यांचं राज्यसभा उपसभापतिपदी
निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं.
****
लोकसभेत आज तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी
संरक्षण जमीन वाटप करण्याच्या मुद्यावरुन गदारोळ केला. कामकाज सुरु होताच या सदस्यांनी
हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र अध्यक्षांनी परवानगी न दिल्यानं सदस्यांनी
गदारोळ करत घोषणाबाजी केली. त्यामुळे सदनाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित झालं होतं.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर ठिकठिकाणी
बंद पाळण्यात येत आहे. संवेदनशील ठिकाणी
शीघ्र कृतीदल, केंद्रीय
औद्योगिक सुरक्षादल आणि राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नांदेड शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व मार्गावर
आंदोलक शांततेत ठिय्या आंदोलन करत आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ मोठ्या संख्येनं आंदोलक ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
नांदेड हिंगोली मार्गावर डोंगरकडा इथं सकाळपासून बंद पाळण्यात येत आहे.
औरंगाबाद
शहरात आकाशवाणी चौकात गेल्या तीन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु असून, औरंगाबाद जालना
मार्ग आंदोलकांनी रोखून धरला आहे. आंदोलक शहरातून वाहन फेऱ्या काढत आहेत. वकील संघटनेनं
या बंदला पाठिंबा देत आकाशवाणी चौकातून मोर्चा काढला.
हिंगोली जिल्ह्यातही पूर्ण बंद पाळण्यात येत असून,
ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे. सेनगाव इथं अज्ञात आंदोलकांनी शाळेची बस जाळली.
परभणी शहरासह जिल्ह्यात पूर्ण बंद पाळण्यात येत असून,
पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी विविध मार्गांवर पाहणी केली. पाथरी तालुक्यात
शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह आंदोलनात सहभाग घेतला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात पिंपळनेर रस्त्यावर
आंदोलकांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केलं. बीड, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, रायगड, यवतमाळ जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून, बससेवा, शाळा,
महाविद्यालयं, बाजारपेठा बंद आहेत. ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या राफियाबाद
परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या
दहशतवाद्यांची संख्या आता पाच झाली आहे. काल रात्री चार दहशतवादी मारले गेले, तर एक
दहशतवादी आज सकाळी मारला गेला. या परिसरात अजुनही चकमक सुरु आहे. या कारवाईत एक लष्करी
जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
आमदार
किंवा खासदारांच्या विरोधात दाखल फौजदारी खटल्याच्या कोणत्या टप्प्यावर त्यांना अपात्र
घोषित करता येऊ शकतं, याबाबत विचारणा करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी
सुरू करणार आहे. मार्च २०१६ मध्ये तीन न्यायाधीशांच्या पीठानं हे प्रकरण सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवलं होतं. फौजदारी
खटला दाखल असलेल्या आमदार - खासदारांना त्यांच्यावर आरोप निश्चित झाल्यावर अपात्र ठरवायचं,
की ते दोषी ठरल्यावर अपात्र ठरवायचं, याबाबत याचिकांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला
आहे.
****
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध
मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. धुळे जिल्हा सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं.
****
पावसानं
महिनाभरापासून उघडीप घेतल्यानं शेतकरी चिंतेत असून त्यांच्या अडीअडचणी, समस्या
जाणून घेण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल वैजापूर तालुक्यात मनोली, जिरी
आणि बळेगावातील शेतकऱ्यांशी भेटून संवाद साधला. पावसाअभावी
कापसाची वाढ खुंटली असून मका
पिकांचही नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी
जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.
****
वियतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजय जयरामनं पुरुष
एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात
अजयनं इंडोनेशियाच्या पिलांग पिकहिलाचा २१ - सात, २१ - १६ असा पराभव केला. महिला एकेरीत
रुतुपर्णा दासनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला दुसरा सामना आज लॉर्डस इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी
साडेतीन वाजता सामना सुरु होईल.
*****
***
No comments:
Post a Comment