Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 9 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
अनुसुचित
जाती जमाती अत्याचार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक २०१८ संसदेत पारित झालं आहे. राज्यसभेत
आज हे विधेयक आवाजी मतदानानं पारित झालं, तर लोकसभेत यापूर्वीच पारित झालं आहे. ॲट्रॉसिटी
कायद्यातलं मूळ प्रारुप कायम ठेवण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****
मराठा
आरक्षण मागणीसाठी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. मराठवाड्यात
आंदोलकांनी रेल रोको केला. नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस
ह्या दोन्ही गाड्या औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रोखून धरण्यात आल्या होत्या. अमरावती-तिरुपती
एक्स्प्रेसवर दगडफेक झाली. नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस चुडावा-पूर्णा दरम्यान दोन
तास, तर अमरावती -तिरुपती एक्स्प्रेस चुडावा-नांदेड दरम्यान एक तास थांवण्यात आली होती.
परळी - अकोला, अकोला - नांदेड आणि परभणी - नांदेड सवारी गाडी आज रद्द करण्यात आल्या
आहेत.
औरंगाबाद
शहरात जालना रस्त्यावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
लातूर
जिल्ह्यात व्यवहार, वाहतूक पूर्णपणे बंद होती. शहरात ठिठिकाणी रस्ता रोको करण्यात आला.
रेणापूर फाट्यावर आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक
भिसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
उस्मानाबाद
जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तसंच रक्तदान
करण्यात आलं.
नाशिकमध्ये
आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली, तर मध्यरात्री
तीन शिवशाही बसही फोडण्यात आल्या. अहमदनगर, सातारा, वाशिम, गोंदिया, सोलापूर, बुलडाणा,
रायगड जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य
शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा या प्रमुख मागणीसाठी
पुकारलेला संप आज दुपारी मागं घेतला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांची समन्वय
समिती आणि राज्याच्या मुख्य सचिवांदरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात
आला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून, लवकरात लवकर आवश्यक
ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन मुख्य सचिवांनी दिलं.
****
सगळ्यात
जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या वस्त्रोद्योग विभागाला चालना मिळावी यासाठी वीज अनुदानासाठी
म्हणून सुमारे ३७० कोटी रुपयांची तरतूद करून डिसेंबरपर्यंत ही रक्कम वस्त्रोद्योग विभागाला
देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात नव्याने
लागू करावयाच्या वस्त्रोद्योग धोरणासंदर्भात मुंबई इथं आज झालेल्या बैठकीत ते बोलत
होते.
ऊस
पिकाखालचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची आढावा बैठकही आज मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत पार पडली. या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी,
असे निर्देश त्यांनी दिले. जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार
नाहीत, त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील, तसंच ज्या बँका या योजनेची अंमलबजावणी
करणार नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
ऑगस्ट
क्रांतीदिनी आज मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना
आदरांजली वाहण्यात आली. शिक्षण मंत्री विनोद तावडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक
चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी हुतात्म्यांना अभिवादन
केलं.
नांदेड
इथल्या हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुष्पचक्र वाहून
अभिवादन करण्यात आलं.
परभणी
शहरातील क्रांतीचौक इथल्या हुतात्मा स्मारकास महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
जालना
शहरातल्या जुना मोंढा भागात आज दुपारी बांधकाम सुरू असताना जुन्या गोदामाची भिंत कोसळल्यानं
दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य चारजण गंभीर जखमी झाले. प्रकाश
खंदारे, काकासाहेब कबाडे अशी मृतांची नावे आहेत.
****
औरंगाबाद
इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. आदिवासी समाजाला विविध समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या
दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघानं १९९४ साली जागतिक आदिवासी दिनाची घोषणा केली
होती.
****
भारत
आणि इंग्लंड दरम्यान लॉर्डस इथं दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पावसाचा
व्यत्यय आला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत यजमान इंग्लंड संघानं पहिली कसोटी जिंकून
आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment