Saturday, 18 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.

**** 

v माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

v राष्ट्रपती रामनाथ कोविंद, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख आणि अनेक देशांच्यां प्रतिनिधींकडून  पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण

v मराठवाड्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी; राज्यातही अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस

v औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण

 आणि

v जालना जिल्ह्यातल्या पाच लाख ८९ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्यापोटी १७६ कोटी ८१ लाख रुपये जमा

****



 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीत राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नी दिला. तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून वाजपेयी यांना मानवंदना दिली. त्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करुन वाजपेयी यांना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई, भुतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, सरसंघचालक मोहन भागवत, यांच्यासह अनेक मान्यवरांनी, वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र वाहून, श्रद्धांजली अर्पण केली.



 तत्पूर्वी काल सकाळी भाजप मुख्यालयात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पुनम महाजन, अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी वाजपेयी यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.



 दुपारच्या सुमारास भाजप मुख्यालयापासून वाजपेयी यांची अंत्ययात्रा निघाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, विविध राजकीय पक्षांचे अनेक नेते, वाजपेयी यांचे अनेक सहकारी मित्र आणि मोठा जनसमुदाय या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांनी अंत्ययात्रेवर पुष्पवर्षाव करून, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

****



 भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ७७ वर्षीय वाडेकर यांचं गेल्या बुधवारी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं.

****



 मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. पावसानं काल अनेक भागात उघडीप दिली, मात्र अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.  

 जालना जिल्ह्यात पावसानं काल उघडीप दिली. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चार महसूल मंडळं वगळता, अन्य ४५ मंडळांमध्ये प्रथमच अतिवृष्टीची नोंद झाली. भोकरदन तालुक्यातल्या मरखेडा इथले वसंत क्षीरसागर हे पूर्णा नदीत वाहून गेले, बचाव पथकानं त्यांचा शोध घेतला मात्र, काल रात्री उशिरापर्यंत त्यांचा तपास लागू शकला नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 बीड जिल्ह्यातल्या नऊ महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसानं कपाशी, सोयाबीन पिकांना जीवदान मिळालं, मात्र प्रतिएकरी मिळणाऱ्या उत्पादनात काही अंशी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. जिल्ह्यात सरासरी ७२ पूर्णांक ४० टक्के एवढा पाऊस झाला असून, माजलगावमध्ये सर्वाधिक ७८ पूर्णांक ३३ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली.



 परभणी जिल्ह्यात ७२ पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.



उस्मानाबाद जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाला. काल दुपारी पावसानं उघडीप दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ३४७ मिलीमीटर पाऊस झाला.



 हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे तलाव, नदी नाले काठोकाठ भरुन वाहत आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ६५ टक्के पावसाची नोंद झाली.



नांदेड जिल्ह्यात ८ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. किनवट इथं पैनगंगा काठावरील जवळपास २०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं वृत्त आहे.



 लातूर जिल्ह्यात सलग दोन दिवस भीज पाऊस झाला. मात्र जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यानं, धरणाची पाणी पातळी २९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. धरणात सध्या सुमारे चार हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सात हजार ३५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.



 नाशिक शहरातही गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९० टक्के, तर गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे.



 अहमदनगर जिल्ह्यातले मध्यम लघु प्रकल्प अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भंडारदरा वगळता सर्वच धरणाची परिस्थिती बिकट आहे.



 नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात काल मुसळधार पावसानंतर काही नद्यांना पूर आला. या पूरात वाहून गेल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला. तालुक्यात नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक घरं वाहून गेली, पिकांसह पशुधनाचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वाई तालुक्यातील धोम धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यानं, वाई इथलं महागणपती मंदीर पाण्यानं वेढलं आहे. कोयना धरणातून सुद्धा विसर्ग सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन अनुसूचित आणि नवबौद्ध कुटुंबांना भूखंड वितरीत करण्यासाठी, भूसंपादन करणाऱ्या समितींची जिल्हानिहाय रचना होणार आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. राज्यशासनाच्या एका अधिकृत पत्रकात काल ही माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला जमीन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल आणि उरलेल्या 50 टक्के रक्कमेसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

****



 औरंगाबाद महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना ही मारहाण होत असताना सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून त्यांना सभागृहाबाहेर नेलं. भाजप नगरसेवकांनी या पार्श्र्वभूमीवर मतीन यांच्या कायमस्वरुपी निलंबनाची मागणी केली. त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव बहुमतानं संमत झाला. नगरसेवक सय्यद मतीन यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



दरम्यान, मतीन यांची भूमिका पक्षाची भूमिका नसल्याचं, आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे. मतीन यांच्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही, मात्र त्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

****



 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीनं घेण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.



 लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी खासदार रुपा पाटील निलंगेकर यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****



 जालना जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे सहा लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांचा विमा काढला होता. नैसर्गिक कारणांमुळे यातल्या काही पिकांचं नुकसान झाल्यानं विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून, जिल्ह्यातल्या पाच लाख ८९ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १७६ कोटी ८१ लाख रुपये पीक विम्यापोटी जमा करण्यात आले आहे़त. जालना तालुक्यातल्या माळशेंद्रा इथले शेतकरी रामेश्वर जाधव यांनाही प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळाला आहे़. हा अनुभव त्यांनी या शब्दात कथन केला...



मी रामेश्वर अंकुश जाधव. राहणार माळशेंद्रा, तालुका जिल्हा जालना. मी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत माझ्या ५ हेक्टर जमिनीवर २८६० रूपये पीक विमा भरलेला होता. त्या पोटी मला १८ हजार ४०० रूपये प्राप्त झालेले आहेत. तसेच आमच्या गावातील बऱ्याचं शेतकऱ्यांनी सुध्दा पीक विमा भरलेला होता. त्यांना सुध्दा लाभ झालेला आहे. त्या बद्दल मी सरकारचा आभारी आहे.

****



 अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून इंडोनेशियात सुरुवात होत आहे. भारताचं ५७२ क्रीडापटूंचं पथक या स्पर्धेत सहभाग घेणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताचा ध्वजवाहक असेल, आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास या स्पर्धेचं उद्धाटन होणार असून, दोन सप्टेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.

****



 भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा कसोटी सामना आजपासून नॉटिंगहॅम इथं सुरू होत आहे. या कसोटी मालिकेत भारत शून्य - दोननं मागे आहे.

****



 दक्षिण आशियाई फुटबॉल संघाच्या १५ वर्षांखालच्या मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात आज होणार आहे. भूतानमध्ये थिंपू इथं परवा झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं नेपाळवर दोन - एक नं मात करत अंतिम फेरीत धडक मारली.



*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...