Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१९ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
विधानसभा निवडणुकीचा
प्रचाराचा आज शेवटचा दिवस
Ø
पंतप्रधानांसह
दिग्गज नेत्यांच्या सभांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Ø
भाजपकडून प्रचार
मोहिमांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
Ø
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून
बारा तास चौकशी
आणि
Ø
औरंगाबाद जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस; पिकांचं नुकसान
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या
प्रचाराची मुदत आज सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. जाहीर प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस
असल्यानं, सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत
पोहोचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, कोपरा बैठकांसह पदयात्रांच्या
माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर सभा झाली. महाराष्ट्रात
गेल्या जवळपास पाच दशकांत आपल्या पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करणारे देवेंद्र
फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. बहुतांशी सरकारी कामं
ऑनलाईन झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी होत असल्याचं ते म्हणाले. आपल्या सरकारनं केलेल्या
विकास कामांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे नेते यावेळी
उपस्थित होते. नवभारतासोबत नव महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प
केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तर, महायुतीसमोर कोणीही राजकीय विरोधक नसल्याचं
सांगत, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधला विचार संपून आता विकार उरला असल्याची टीका केली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात आल्लापल्ली इथं भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा
घेतली. गडचिरोली जिल्हा येत्या पाच वर्षांत नक्षलमुक्त करण्यात येईल, असा विश्वास शहा
यांनी व्यक्त केला. शहा यांची यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथंही सभा झाली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल बीड जिल्ह्यात केज - परळी मतदारसंघात अंबाजोगाई
इथं सभा झाली. या परिसरात नवीन कारखाने येण्याची गरज असून बेरोजगार तरुणांना रोजगार
मिळणं आवश्यक असल्याचं, पवार यावेळी म्हणाले. पवार यांनी
काल पंढरपूर तसंच सातारा इथंही सभा झाली. सातारा इथं पडत्या पावसात पवार यांनी सभेला
संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवाराची निवड करताना चूक झाल्याचं
पवार म्हणाले.
****
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी
काल सांगली इथं प्रचारसभा घेतली. जात, धर्म, मंदिर आणि मशीद यांची चर्चा करण्याऐवजी
बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं महत्त्वाचं असल्याचं शिंदे म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल उमरगा इथं प्रचार सभेला संबोधित केलं. देशभरात पायाभूत
सुविधा आणि माहिती तंत्रज्ञानाचं जाळं काँग्रेसच्या कार्यकाळात विकसित झाल्याचं, खरगे
म्हणाले.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली
नसती, असं भाजपचे ज्येष्ठ नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात
राशीन इथं महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. परळी इथंही उदयनराजे
यांनी सभा घेतली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातल्या कोथरुड इथं प्रचारसभेला संबोधित केलं.
कोथरुडमध्ये महायुतीकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे
यांनी, कोथरुडमध्ये बाहेरचा उमेदवार लादला, अशी टीका केली. मनसेला विरोधी पक्ष बनवण्याचा
पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांनी काल नागपूर इथं सभा घेतली. वीज पुरवठ्याबाबत दिल्ली सरकारला
जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
युवासेना प्रमुख आदित्य
ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं प्रचारसभेला संबोधित केलं. शिवसेनेला संपूर्ण
महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असं ते म्हणाले.
****
भारतीय जनता पक्ष हा
आपल्या नेत्यांच्या प्रचार मोहिमांमधे अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं
केला आहे. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे, हवाई मार्गांमधे तांत्रिक
अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यांमुळे काँग्रेस
आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना हवाई मार्गाने प्रवासाची परवानगी नाकारण्यात
आल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रस
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली
संचालनालय ईडीने जवळपास बारा तास चौकशी केली. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या
कथित व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, एअर इंडीया
ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी, तसंच पंजाब - महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या
प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी केली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नेते रमेश कदम यांच्या ठाणे इथल्या एका सदनिकेतून पोलिसांनी काल त्रेपन्न लाख
रुपये जप्त केले. वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात परत जाताना कदम यांनी, पोलिस पथकाला
एका मित्राला भेटण्यासाठी घरी घेऊन जाण्याची विनंती केली, या मित्राजवळून पोलिसांनी
ही रक्कम जप्त करत, त्या मित्रालाही ताब्यात घेतलं. या प्रकरणी संबंधित पोलिस पथकावर
कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातल्या
मोहोळ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या रमेश कदम यांना शेवटच्या टप्प्यात
प्रचार आणि मतदानासाठी जामीन किंवा रजा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
****
निवडणूक प्रचाराच्या
काल अखेरच्या सायंकाळी मराठवाड्यात बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठका
आणि पदयात्रांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर- सेलू मतदार संघातल्या
भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ बोरी इथं भाजपचे नेते गोपीचंद
पडळकर यांची सभा झाली. भाजपनं केलेल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी यावेळी विरोधी
पक्षांवर टीका केली.
हिंगोली विधानसभेचे वंचित
बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम अहेमद देशमुख आणि वसमत विधानसभेचे उमेदवार मुनीर पटेल या
दोन उमेदवारांनी अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएमनं आपला पाठिंबा
जाहीर केला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात शहरातल्या
तीन आणि ग्रामीण भागातल्या सहा मतदारसंघातले उमेदवार प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी
जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, कोपरा बैठका घेत आहेत. एमआयएम
पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील तिनही मतदार संघांत मतदारांच्या घरोघरी
जाऊन भेटी घेतल्या, तसंच प्रचार सभांना संबोधित केलं.
सिल्लोड मतदारसंघात अपक्ष
उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी जाहीर सभा घेतली. औरंगाबाद पूर्वचे महायुतीचे उमेदवार
अतुल सावे यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या. मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक सुभाष
पाटील यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजू शिंदे आणि औरंगाबाद पूर्व
मतदारसंघातले महायुतीचे उमदेवार अतुल सावे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या
शिरुर अनंतपाळ इथं महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित
सभेला अरविंद पाटील यांनी संबोधित केलं. काँग्रेसनं ५५ वर्षांच्या काळात केलेला विकास
आणि भाजपनं गेल्या पाच वर्षात केलेला विकास, यावर खुली चर्चा करावी, असं आव्हान त्यांनी
यावेळी दिलं. केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही काल लातूर आणि शिरुर
अनंतपाळ इथं जाहीर सभा घेतल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड,
सिल्लोड, सोयगाव आणि खुलताबाद परिसरात काल मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाचा शेतात
उभ्या कपाशीला फटका बसला, तर काढणी झालेल्या मका, सोयाबीन तसंच बाजरीचंही नुकसान झाल्याचं
वृत्त आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्रभर पावसाची संततधार
सुरु होती. लातूर शहरातही विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचं वृत्त
आहे..
****
निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी राबवल्या जात असलेल्या
मतदार जनजागृती अभियानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड शहरात मतदार
जागृती अभियानांतर्गत `मी मतदान करणार` अशी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं
नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी पदयात्राही काढण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातमधे हिवरा
पाटी तपासणी नाक्यावर स्थिर तपासणी पथकानं एक लाख पासष्ट हजार रूपये किंमतीचा अवैध
मद्याचा साठा जप्त केला. हा मद्यसाठा एका खाजगी वाहनातून नांदेडहून कळमनुरीकडे नेला
जात होता.
****
जालना विशेष कृती दलाच्या पथकानं औरंगाबाद-बीड मार्गावरच्या
बारसवाडा फाट्याजवळ सापळा लावून एका ट्रकमधून ३७ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा
जप्त केला. काल सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण ६२ लाख ८०
हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रक चालकाला ताब्यात घेतलं.
*****
***
No comments:
Post a Comment