Saturday, 19 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.10.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 १९ ऑक्टोबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराची मुदत आज सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. जाहीर प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यानं, सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, कोपरा बैठकांसह पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. आज  अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा होत आहेत.

 दरम्यान,मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नाशिक जिल्ह्यात व्होट कर नाशिककर ही मोहीम जिल्हा प्रशासन विविध संस्थांच्या च्या माध्यमातून राबवत आहे. नाशिक शहरातल्या पंचवटी भागातल्या बाफना बाजाराकडून  मतदान करून त्याची नोंदणी करणाऱ्या मतदारांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीत विजयी ठरणाऱ्या मतदाराला ३२ इंची टीव्ही भेट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, देवळा इथल्या रघुनाथ हरी कोठावदे पतसंस्थेच्यावतीनं मतदान करून देवळा आणि लोहोणेर इथल्या पतसंस्थेत सर्व प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर मतदारांना बक्षीस देण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
****

 राज्यात अनेक ठिकाणी  आज सकाळपासूनच पाऊस सुरु झाला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद शहर आणि परिसर तसंच  जालना शहरासह परिसरातही बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. सातारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये  सकाळपासूनच  दमदार पावसाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरु आहेत, या पेरण्यांसाठी हा पाऊस लाभदायक असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 राष्ट्रीय सुरक्षा दल NSG च्या  महासंचालकपदी गुजरात केडरचे पोलीस अधिकारी अनुप कुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय पोलीस सेवेच्या १९८५ च्या तुकडीतले अधिकारी असून ३० सप्टेंबर२०२० पर्यंत या पदावर त्यांची नेमणूक राहील.

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीने काल या प्रस्तावाला मंजुरी दिली.
****

 भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान क्रिकेट कसोटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून रांची इथं सुरु आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद ३७ धावा झाल्या होत्या.भारतानं या मालिकेत २ -० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...