Sunday, 16 February 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.02.2020 11.00


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आज, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. उप राज्यपाल अनिल बैजल हे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
गेल्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे. यात मनिष सिसोदिया, सत्येंदर जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इम्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७० पैकी ६२ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं काल दुपारी एका महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. लासलगाव बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या या महिलेवर तीन ते चार जण पेट्रोल टाकून पसार झाले. या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यात कोठेही पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देण्याचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. नाशिक इथं काल एका कार्यक्रमासाठी आले असता, मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, येत्या एक मार्च ला नांदेड इथं शंकर दरबार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचं उद्‌घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राहणार असल्याची माहिती श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी दिली आहे.
****
अहमदनगर इथल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचा, पहिला शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार, औरंगाबादचे पत्रकार शाहीर शेषराव पठाडे यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे सुनील गोसावी आणि राजेंद्र उदागे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि तीन हजार रुपयांची ग्रंथसंपदा असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...