Thursday, 11 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये, विकास भागीदारी आणि क्षमता बांधणीवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या सहाकाऱ्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्यात आला. तसंच आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रातल्या भविष्यकालीन संधींवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडच्या दौर्यावर जाणार असून, पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. त्यानंतर यासंदर्भात डेहरादून इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली बचाव आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

****

स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो इथं जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात या घटनेचं महत्व अधोरेखित केलं. इतिहासात ही सर्वात गाजलेली आणि प्रेरक घटना असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, सद्भावना आणि बंधुत्वावर भर दिला.

****

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात, भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विनोबा भावे यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचं स्मरण केलं. विनोबा भावे यांचे विचार आपल्याला विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

काश्मीर खोऱ्यातील बडगाम ते दिल्लीतील आदर्श नगर स्थानकापर्यंत मालवाहू रेल्वे सुरू होत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. यामुळे देशभरातल्या फळे आणि हस्तकला विक्रेत्यांना योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. जम्मू-श्रीनगर रेल्वे मार्ग सुरू झाल्याने काश्मीर खोऱ्याची संपर्क सुविधा सुधारली असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं सुधारित कररचना लागू केली आहे. सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी दरांचं तर्कसंगतीकरण करण्यात आलं असून, यामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. आता एअर कंडिशनर, डिशवॉशर ,एलसीडी, एलईडी टीव्ही यांसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर २८ वरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. करातील या कपातीमुळे या वस्तू स्वस्त होतील, ज्यामुळे त्यांची मागणी वाढेल आणि देशांतर्गत उत्पादकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांसाठी वस्तू स्वस्त होतील आणि भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र मजबूत होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं अअहे.

****

सातारा इथं होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे काल पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं. साताऱ्याच ऐतिहासिक महत्त्व या बोधचिन्हातून प्रकट करण्यात आलं आहे. उत्तमोत्तम साहित्याचे मराठीत अनुवाद व्हावेत यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही सामंत म्हणाले. राज्यातल्या अमराठी व्यक्तींना मराठी शिकण्यासाठी लवकरच ॲप विकसित केलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

****

अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी नागरिकांचं जीवनमान उंचावणं, रोजगार वृद्धी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि सक्षमीकरणासाठी, अमरावती जिल्हा परिषद आणि आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्यानं “विकास यात्रा” हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मेळघाटातल्या निवडक गावांमध्ये हा उपक्रम राबवून त्याठिकाणी आर्थिक मदत आणि विविध योजनांद्वारे विकासाला गती देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचं नुकतचं अमरावती इथं सादरीकरण करण्यात आलं, यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

****

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताच्या जास्मिन लांबोरिया, नुपूर शेरॉन आणि पूजा राणी यांनी उपान्त्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचं किमान एक पदक निश्चित झालं आहे. मुष्टियोद्धा निखत झरीनला मात्र उपान्त्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा जलतरण क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे. सिद्धार्थ उद्यान परिसरातल्या जलतरण तलवा इथं शुक्रवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरण जवळपास ९८ टक्के भरलं आहे. धरणात तीन हजार ५४९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, सध्या पाच हजार १०७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

येलदरी धरणातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात येणार असून, चार हजार २१९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.   

****

No comments: