Friday, 12 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल अअचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान भारतम विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते ज्ञान भारतम पोर्टलचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम या डजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

****

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी देशातल्या डेंग्यू आणि हिवताप संसर्गाच्या परिस्थितीचा काल आढावा घेतला. महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यांत झालेल्या पावसामुळे डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी महानगरपालिका, पंचायती आणि स्थानिक संस्थांनी अधिक तीव्र प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय अंमलात आणावेत, असं आवाहन नड्डा यांनी केलं.

****

भारतीय सैन्याच्या IASV त्रिवेणी या बोटीच्या पहिल्या परिक्रमेला काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथून सुरू झालेल्या या मोहिमेत भूदल, नौदल आणि हवाई दलातल्या १० महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही बोट २६ हजार नॉटिकल मैलांपेक्षा जास्त प्रवास करणार असून, चार परदेशी बंदरांवर मुक्काम करेल. प्रदक्षिणा पूर्ण करुन ही बोट पुढच्या वर्षी मे महिन्यात पुन्हा भारतात परतणार आहे.

****

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनचं बांधकाम, पुरवठा आणि चाचणीसंदर्भात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने लार्सन आणि टुब्रो कंपनीबरोबर करार केला. यात मुंबई बुलेट ट्रेन स्थान आणि महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच्या झरोली गावादरम्यान एकूण १५७ किलोमार्गाचं संरेखन, चार स्थानकांसाठी रुळाचं काम आणि ठाणे इथल्या रोलिंग स्टॉक डेपोचा समावेश आहे.

****

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवत राज्यातल्या महावितरणनं देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्र्याचे आभार मानतो तसंच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, असं लोकेश चंद्र यांनी म्हटलं आहे.

****

वीजचोरीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच वैजापूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयात १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. अशा वीज ग्राहकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तज्ज्ञ अभ्यास समिती मंडळावर अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले यांची निवड झाली आहे. डॉ. इंगोले यांचं मनोविकृती शास्त्रातलं योगदान, सामाजिक कार्यातला सहभाग आणि विविध शासकीय समित्यांवर विविध पदावर कार्य केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात डासांची पैदास होऊन मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नागरीकांनी दर आठवड्याला एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती मोहीम राबवावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातल्या ताहाराबाद मुल्हेर रस्त्यावर मजुरांची वाहतूक करणारा पिकअप आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाले.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर ग्रामीण हद्दीत एटीएम मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्जीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्यप्रदेशातल्या चार जणांना या प्रकरणी अटक केली. या आरोपींकडून १२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे चार दरवाजे अर्धा फूट उघडून दोन हजार ९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments: