Friday, 12 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      गुंतवणूक आणि उद्योगांसाठी राज्यात पोषक वातावरण - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; सरकारचे विविध कंपन्यांसोबत एक लाख आठ हजार ५९९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

·      जीएसटीतल्या दरकपातीनंतर सुधारीत दरांचा माहितीफलक लावण्याच्या केंद्र सरकारच्या विक्रेत्यांना सूचना

·      सी पी राधाकृष्णन आज घेणार उपराष्ट्रपतीपदाची शपथ

·      श्रीक्षेत्र तुळजापूर इथं शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी, १४ सप्टेंबरपासून श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा

आणि

·      मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता उर्वरीत जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

इज ऑफ डूईंग बिसनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल मुंबईत इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या परिषदेत ते बोलत होते. गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यशासन सदैव तत्पर असल्याचं सांगून, येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणं जाहीर होणार आहेत, त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, आपले सरकार हे पोर्टल तंत्रज्ञानस्नेही करून, ते दोन ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत 'समग्र' या संस्थेसोबत झालेल्या या संदर्भातल्या बैठकीनंतर बोलत होते. सरकारच्या सेवा व्हॉट्सॲप वर देखील उपलब्ध होणार असून, सुशासनात आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारनं तब्बल एक लाख आठ हजार ५९९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. या गुंतवणुकीतून एकूण ४७ हजार १०० इतक्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

हैदराबाद गॅझेटियरचा शासननिर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा पोहोचवत नसल्याचा पुनरुच्चार, मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या शासननिर्णयाविरोधात ओबीसी नेते न्यायालयात दाद मागणार असल्याच्या प्रश्नावर बोलतांना त्यांनी, या सर्व नेत्यांना सदरील शासननिर्णय पुन्हा एकदा नीट वाचण्याचं आवाहन केलं.

**

दरम्यान, या शासन निर्णयातली संदिग्धता दूर करावी किंवा हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी, ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा निर्णय जारी करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल परंतु त्यातल्या तरतुदींमुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होऊ शकतं, असं त्यांनी नमूद केलं.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळेल याकडे लक्ष द्यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात विविध महामंडळाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्यातल्या अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखड्याचा आढावा, तसंच क्रीडा धोरणासंदर्भातही त्यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. राज्यातली सर्व क्रीडा संकुलं अद्ययावत करावीत, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यात यावं, आदी निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

****

वस्तू आणि सेवा कर- जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांचा माहितीफलक दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना केल्या आहेत. घाऊक तसंच किरकोळ विक्रेत्यांना असे फलक लावावे लागणार असल्याची सूचना, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केली.

दरम्यान, वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं कररचनेत केलेले बदल येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत. ही कररचना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आणि देशाचं सकल उत्पन्न वाढवणारी असल्याचं धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी म्हटलं आहे.

बाईट – लक्ष्मीकांत जाधव

****

सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

दरम्यान, सी पी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील.

****

नक्षलवाद बिमोडासंदर्भात काल छत्तीसगड राज्यात तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनोज याचाही समावेश आहे.

बिजापूर जिल्ह्याच्या विविध भागातून २६ नक्षलवाद्यांना काल सुरक्षा दलांनी अटक केली. यापैकी सहा नक्षलवाद्यांवर सुमारे १३ लाख रुपये बक्षीस होतं.

तिसरी स्वागतार्ह घटना नारायणपूर जिल्ह्यात घडली, इथल्या १६ नक्षलवाद्यांनी काल पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसर्पण केलं. राज्य सरकारनं या सर्वांना प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रुपयांची मदत दिली.

****

धाराशिव जिल्ह्यात श्रीक्षेत्र तुळजापूर इथं जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काल शारदीय नवरात्र महोत्सव तयारीचा आढावा घेतला. परंपरेनुसार १४ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा होणार असून, २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल. नवरात्र काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागून यंत्रणांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात, असे निर्देश पुजार यांनी दिले.

****

बुद्धगया इथलं महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या प्रमुख मागणीसाठी लातूर आणि अहमदपूर इथं काल जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. आंदोलनाचे प्रणेते भन्ते विनचार्य हे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मार्गांवर धम्म ध्वज फेरी काढण्यात आली. या रॅली मध्ये बौद्ध उपासक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी, शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत समन्वयानं काम करण्याचं आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केलं. काल धाराशिव इथं यासंदर्भातल्या कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले,

बाईट – आमदार कैलास पाटील

 

विविध ग्रामपंचायतींनी पंचायतराज अभियानात विशेष कार्य केल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात येत्या १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी धावणार आहे. त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ब्रिजेशकुमार सिंग, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी काल बीड रेल्वे स्थानक आणि परिसराची पाहणी केली.

****

मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत काल परभणी इथं, जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना शिफारस पत्र देण्यात आली. गेल्या दोन सप्टेंबरला झालेल्या छाननीत १९ उमेदवार या नियुक्तीला पात्र ठरले होते. संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्र प्रदान करणार आहेत.

****

नांदेड इथलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, आणि पुणे इथल्या अॅसपायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १३ सप्टेंबरला नांदेडला विद्यापीठात “भव्य रोजगार मेळाव्या” चं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी जवळपास पाच हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, २५ ते ३० नामांकित कंपन्यांसह अनेक उद्योग समूह सहभागी होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २४६ शिबीरांत एकूण २० हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

बीड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील १५ डीजे वर कारवाई करत ५ लाख ४ हजार रुपये दंड वसूल केला. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य शासनाच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्ल ही कारवाई करण्यात आली.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

****

No comments: