आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
*****
काश्मीर
खोऱ्यात निदर्शनं करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लास्टिकच्या बंदुक गोळ्यांचा
वापर करावा, असे निर्देश गृह मंत्रालयानं सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. गेल्या दोन
दिवसांपासून काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. रविवारी आंदोलनकर्त्या
विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ काल
काश्मीर मध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली होती. दरम्यान,
यासंदर्भात जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
महेबुबा मुफ्ती यांनी राज्यमंत्रीमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
****
तमिळनाडूमध्ये ऑल इंडिया अन्ना दम्रुक पक्षाच्या दोन्ही गटात
तडजोड होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता आणि पक्षाच्या विद्यमान
महासचिव शशिकला या दोन्ही गटाच्या समर्थक नेत्यांची काल रात्री चेन्नईत बैठक झाली.
हे दोन्ही गट एकत्र आले, तर पक्षाचं मूळ नाव तसंच निवडणूक आयोगानं गोठवलेलं निवडणूक
चिन्ह पक्षाला परत मिळण्याची शक्यता आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारे, विशेष वाड्:मय पुरस्कार
येत्या रविवारी समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
माजी
कृषी मंत्री खासदार शरद पवार, आणि ज्येष्ठ
चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार
पटेल यांना या सोहळ्यात ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी
सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
यंदाचा ग.ल. ठोकळ ग्रामीण साहित्य मित्र पुरस्कार ज्येष्ठ
समीक्षक वासुदेव मुलाटे यांना जाहीर झाला आहे. पुणे इथं येत्या २४ तारखेला हा पुरस्कार
प्रदान केला जाणार आहे.
****
भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी आयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पुढील आठवड्यात
होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या बैठकीत बी सी सी आयचं प्रतिनिधित्व
करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. श्रीनिवासन यापूर्वी हित जोपासण्याच्या
मुद्यावर दोषी आढळले असल्यानं त्यांना मंडळाचं प्रतिनिधित्व करता येणार नाही, असं न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे. मंडळाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना या बैठकीत प्रतिनिधित्व
करण्याची परवानगी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment