Thursday, 18 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 18 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       मनमाड - जळगाव दरम्यान तिसऱ्या विद्युत रेल्वे मार्गाच्या उभारणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·       डाळ साठ्यावरच्या मर्यादेचं बंधन संपुष्टात

·        विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला रायगड इथून सुरुवात

आणि

·       औरंगाबादमध्ये नगरसेवकाच्या घरी अभियांत्रिकी परीक्षेचा पेपर सोडवणाऱ्या २६ विद्यार्थ्यांसह, नगरसेवक, साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांना अटक

****

मनमाड - जळगाव दरम्यान तिसऱ्या विद्युत रेल्वे मार्गाच्या उभारणीला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली. हा मार्ग १६० किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या, दहा अणुभट्ट्या उभारण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. प्रत्येकी सातशे मेगावॅट क्षमतेच्या या अणुभट्ट्या असणार आहेत.

मातृत्व लाभासंबधीच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं काल कार्योत्तर मंजुरी दिली. गेल्या एक जानेवारीपासून ही योजना देशातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून, केवळ पहिल्या अपत्यासाठीच ती लागू आहे. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतर स्त्रियांचं योग्य पोषण व्हावं याकरता हे लाभ दिले जातात. या काळातल्या रजेमुळे स्त्रियांचं आर्थिक नुकसान होऊ नये याकरता, त्यांना रोख स्वरूपात अर्थसहाय्य करण्याची तरतूद या योजनेत आहे.

****

ेंद्र सरकारनं डाळ उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव आणि संरक्षण देण्यासाठी डाळीच्या साठ्यावरची मर्यादा काल उठवली. याबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले. अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

****

रक्तातल्या नात्यात बक्षिस दस्तावेज करताना, त्यावर मुद्रांक शुल्क आकारण्याचा राज्य सरकारचा कुठलाही मानस नाही, असा खुलासा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.   महानगरपालिके लगतच्या भागात पाच टक्के मुद्रांक शुल्क होतं, तर महानगरपालिका क्षेत्रांत चार टक्के शुल्क आकारलं जात होतं, ते आता सरसकट पाच टक्के करण्यात आलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुद्रांक शुल्क वाढीच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावर महसूल मंत्र्यानी हे स्पष्टीकरण दिलं .

****

राज्यातल्या विरोधी पक्षानी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला काल रायगड इथून सुरुवात झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल रायगडावर जाऊन शिवरायांचं दर्शन घेतलं, त्यानंतर चवदार तळ्याला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कर्जमाफीचा निर्णय  घेण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केला आहे. यात्रेला सुरुवात केल्यानंतर ते काल महाड इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोर्चा काढणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी नाशिक इथं शिवसेनेच्यावतीनं आयोजित कृषी अधिवेशनासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली.

****

यंदाचा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस परवा २० मे रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षी हा दिवस २१ मे रोजी साजरा केला जातो, मात्र यंदा २१ मे रोजी रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे  शनिवारी २० मे रोजी हा दिवस साजरा केला जावा असं शासनाच्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.

****

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात देण्यात आलेल्या विशेष वागणुकीची चौकशी करण्याचे आदेश कारागृह विभागानं दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत आरोप केला होता. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद शहरानजिक चौका इथं असलेल्या, साई अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या २६ विद्यार्थ्यांना शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकी परीक्षेचे पेपर सोडवत असताना, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल अटक केली. अभियांत्रिकीच्या सिव्हील शाखेचा एक पेपर  मंगळवारी झाला. तोच पेपर सुरे यांच्या घरी मंगळवारी रात्री हे विद्यार्थी सोडवत असल्याची माहिती, मिळाल्यानंतर, पोलिसांनी सुरे यांच्या घरावर छापा घातला. या २६ विद्यार्थ्यांसहित शिवसेना नगर सेवक, सीताराम सुरे, साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थाचालक गंगाधर मुंढे, मंगेश मुंढे, प्राचार्य संतोष  देशमुख, प्राध्यापक विजय आंधळे यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द केलं आहे. या केंद्रावर होणाऱ्या परीक्षा आता औरंगाबाद शहरातल्या कांचनवाडी इथल्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात येणार आहेत.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री सौर वाहिनी सुरु केली जाणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणतर्फे उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते काल हिंगोली इथं बोलत होते.या योजनेअंतर्गत राज्यातले सर्व कृषी पंप सौर ऊर्जेनं भारीत केले जाणार आहेत. यामुळे, शेतकऱ्यांना १० ते १२ तास वीजपुरवठा होईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. कृषी पपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी ही योजना कार्यान्वित केली जात असल्याचं ते म्हणाले.

****

ऑनलाईन पीक पेरा असेल तरच शेतकऱ्यांकडू तूर खरेदी करा असे निर्देश जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत. केंद्र सरकारनं भारतीय राष्ट्रीय कृषी विपणन महासंघ-नाफेडला ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पीकपेरा नसेल तर तूर खरेदी केली जाणार नाही, अशी महिती जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या विजेच्या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीनं पालिकेच्या मुख्यालयावर सौर ऊर्जा उपकरणं बसवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी ही माहिती दिली आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयासोबतच सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय, पालिकेच्या शाळा आणि रूग्णालयांच्या इमारतीवरही सौर ऊर्जा उपकरणं बसवण्यात येणार असल्याचं मुगळीकर यांनी सांगितलं. याशिवाय शहरात वीस हरीत बसेस सुरू करण्यात येणार असून त्यातून शहरवासियांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सोलर सिटी योजनेत देशातल्या पंचावन्न शहरांची निवड झालेली असून त्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि नांदेड या दोन शहरांचा समावेश आहे.

****

परभणी जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते आणि जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांनी काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं कांदा पिकाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेतांना एका कृषी सहाय्यक आधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहाथ पकडलं. सतीश सुरवसे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

****

उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या देवगिरी प्रांताच्या शिक्षावर्गाच्या निमित्तानं काल पथसंचलन करण्यात आलं. उद्या या शिक्षावर्गाचा समारोप होणार आहे.

****

देशात वस्तू, आणि  सेवा कर -जीएसटी प्रणालीबाबत ग्राहक आणि व्यापारी वर्गानं कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये, असं आवाहन, औरंगाबाद इथल्या केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयाचे आयुक्त, सी. एल. महर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं, केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालय, आणि विक्रीकर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. लवकरच कोणत्या वस्तूसाठी किती कराचा दर असेल, हे ठरवलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

पोस्टमन मोबाईल एप्लिकेशन या सुविधेला आज औरंगाबाद इथल्या १८ टपाल  कार्यालयात प्रारंभ  केला जाणार आहे. औरंगाबाद क्षेत्राचे जनरल पोस्ट मास्टर प्रणव कुमार यांच्या हस्ते जुना बाजार टपाल कार्यालयात या सुविधेचं उद्घाटन होणार आहे.

//*******//


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...