Tuesday, 20 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.03.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२०  मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात शिकाऊ उमेदवारांनी आज सकाळी मुंबईत रेल रोको आंदोलन केलं होतं. प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळाली पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. जवळजवळ साडे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे.

****



 महाड इथल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा ९१वा वर्धापन दिन आज महाडमध्ये साजरा होत असून, त्यानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता. सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, स्मारकाचं काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना पहिल्या प्रयत्नात योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यानं, स्मारकाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यासाठी कालावधी लागल्याचं ते म्हणाले.

****



 जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी ग्रामपंचायत कार्यालयात काल समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. तसंच संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले. शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****



 श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या जालना शाखेच्या संचालकपदी विलास नाईक, सुनील किनगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  संस्थेचे अध्यक्ष ज. मो. गांधी यांनी ही नियुक्ती केली.

****



ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचं काल नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. ‘अकाल में सरसया काव्यसंग्रहाकरता त्यांना १९८९ साली साहित्य अकादमी पुरस्कार तर २०१३ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.

*****

***






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...