Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०८ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v राज्यात प्रगतीपथावर
असलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचं १५ हजार कोटीं रूपयाचं कर्ज
घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
v संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुदानात वाढ
v राज्यातल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या तसंच महाविद्यालयांमधल्या निवडणुका लांबणीवर
v दिवंगत नेत्या
सुषमा स्वराज यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
v पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती
अजूनही गंभीर; साडे चारशे गावं महापुराच्या
वेढ्यात
****
राज्यात प्रगतीपथावर
असलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचं १५ हजार कोटीं रूपयाचं कर्ज
घेण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या तीन वर्षांत संबंधित प्रकल्प पूर्ण
होऊन दोन लाख ९० हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन
क्षमता निर्माण होईल. त्याच बरोबर ८९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल.
यामध्ये मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा
मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पाचा तसंच हिंगोली
जिल्ह्यातल्या सहा लधु पाटबंधारे योजनांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातल्या शासकीय
जमिनींवर करण्यात आलेली अतिक्रमणं नियमित करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासही या बैठकीत
मान्यता देण्यात आली. प्राप्त
प्रस्तावांवर पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्याचा निर्णयही यावेळी
घेण्यात आला.
संजय गांधी निराधार अनुदान
योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती
वेतन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यावा मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या
दोन्ही योजनांतर्गत आता दरमहा एक हजार रुपये निर्वाह वेतन मिळेल.
या दोन्ही योजनेत लाभ
घेणाऱ्या विधवा लाभार्थ्यांना एक अपत्य असल्यास दरमहा अकराशे रुपये तर दोन अपत्यं असल्यास
दरमहा बाराशे रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषद
पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णयही कालच्या मंत्रीमंडळ
बैठकीत घेण्यात आला. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय
घेण्यात आला आहे.
राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णयही काल
झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता
लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राज्यात पुराचं पाणी घरांत शिरल्यामुळे,
दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यासही काल मंत्रीमंडळानं मंजुरी
दिली.
****
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर - एनईएफटीची
सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा निर्णय भारतीय रिजर्व्ह बँकेनं जाहीर केला. या
वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे.
बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेचा पतधोरण आढावा काल जाहीर केला. त्यावेळी त्यांनी
ही माहिती दिली. सध्या ही सुविधा कामकाजाच्या दिवसांत सकाळी आठ
ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध असते.
रिजर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ शतांश
टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयानंतर रेपो दर पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्के
तर, रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतका झाला आहे.
****
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पार्थिव देहावर
काल दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवाणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते,
आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वराज यांना अखेरचा
निरोप दिला.
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना
राज्यसभेनं काल श्रद्धांजली
अर्पण केली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी स्वराज यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव
सदनाला वाचून दाखवला. सुषमा स्वराज यांचं योगदान सदनाच्या सदैव स्मरणात राहील, असं
सभापती म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेचं कामकाज काल अनिश्चितकाळासाठी तहकूब झालं. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयात
न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याबाबतचं विधेयक राज्यसभेनं चर्चेविना संमत केलं. या
विधेयकात न्यायाधीशांची संख्या तीसवरून तेहेतीस करण्याची तरतूद आहे.
****
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतलं ३७०वं कलम रद्द करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली. यामुळे आता जम्मू काश्मीर
आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.
जम्मू काश्मीर राज्यातल्या काही शहरातली संचारबंदी
काल चार तासांसाठी स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान, हे कलम रद्द केल्यामुळं पाकिस्ताननं भारताशी असलेले सर्व प्रकारचे
व्यापारी संबध तोडण्याची घोषणा केली. राजनैतिक संबधही पाकिस्ताननं तोडले असून पाकिस्तानातले
भारतीय उच्च्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे. काल पाकिस्तानचे
पंतप्रधान इम्रानखान यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबाद इथं झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा
समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्तही आता भारतात राहणार नसल्याचं पाकिस्तानचे
परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
पश्चिम महाराष्ट्रात पूर
परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातली धरणं
पूर्ण भरली असून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे, यामुळे सर्व
नद्यांना पूर आलेला आहे. या जिल्ह्यांमधली जवळपास साडे चारशे गावं महापुराच्या वेढ्यात
अडकली आहेत. त्यांच्या सुटकेसाठी मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. लष्कर,
नौदल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि स्वयंसेवी संस्थांनी कालपासून एक लाखाहून अधिक
नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवलं आहे. अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
अत्याधुनिक बोटींसह बचाव पथक मदत कार्य करत आहे. पुण्यात पडलेल्या पावसामुळे सोलापूर
जिल्ह्यातलं उजनी धरण काल शंभर टक्के भरलं. सध्या उजनी धरणातून भीमा नदीत दीड लाख दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातल्या
नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातली जवळपास
दोनशे गावं पंचगंगा नदीच्या पुरात अडकली आहेत. तर सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा नद्यांच्या
पुरानं हाहाकार उडवला आहे. अर्ध्या सांगली शहरात सर्वत्र पाणीचं पाणी झालं आहे. पुणे
शहरासह जिल्ह्यातली ६४ गावं पाण्याखाली आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाड्यासह विविध धरणांमधून
पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात मुसळधार
पाऊस असून, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यासह राज्यात काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस
झाला. औरंगाबाद तसंच परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नांदेड, परभणी, वाशिम, अकोला,
इथंही काल चांगला पाऊस झाला. औरंगाबादचं जायकवाडी धरण ६५ टक्क्याहून अधिक भरलं आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण
झाल्यानं राज्यातल्या पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यात आज
अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ
बैठकीपूर्वी पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश दिले. कोल्हापूर, सांगली, सातारा,
पुणे, तसंच कोकणातल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी
पूरग्रस्त भागात आवश्यकतेनुसार वैद्यकीय पथक पाठवण्याचे तसंच आवश्यक औषधांचा पुरवठा
तातडीनं करण्याचे निर्देश दिले. पूरग्रस्त भागातल्या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याची
सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक रद्द करावं आणि निवासी
डॉक्टर्सचं विद्यावेतनं वाढवावं यासह विविध मागण्यासाठी राज्यातल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णलायताल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून संप पुकारला
आहे. जवळपास चार हजार डॉक्टर्स या संपात सहभागी
झाले आहेत. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातले ३३५ डॉक्टर्सही
या संपात सहभागी आहेत. मागण्या मान्य होत
नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स- मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर तडवी यांनी दिली.
****
औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या
कुलगुरूपदी डॉ. के.व्ही.एस सर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या
कार्यकारी परिषदेत त्यांची निवड करण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment