Friday, 9 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.08.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०९ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
सांगली शहरात महापुराची परिस्थिती कायम असून शहरातल्या बाजारपेठेत पाणी शिरलं आहे.  बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आणखी तीन पथकं तर राज्य आपत्ती निवारण दलाची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज काही भागांमधे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य हाती घेतलं जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या एक लाख वीस हजार लोकांना तसंच २५ हजारावर जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, माहूर आणि किनवट या भागात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिकं पिवळी पडत आहेत. दुसरीकडे नांदेड  शहराची जीवन वाहिनी असलेल्या गोदावरी नदी पात्रात अद्यापही अपेक्षित पाणी नाही. नांदेड शहरात तीव्र पाणी टंचाई असून अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या जायकवाडी धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून बासष्ट हजार पासष्ट घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणी साठा सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
****
मजुरी संहिता विधेयक २०१९, बेकायदा कारवाया प्रतिबंध विधेयक, तसंच दुरुस्ती आणि संशोधन विधेयक २०१९ या विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संमती दिली आहे. संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ही विधेयकं संमत झाली होती. मजुरी विधेकाच्या संमतीमुळे कोणत्याही भेदभावा शिवाय सर्वांना समान आणि निश्चित वेळेत मजुरी मिळणार आहे.
****
भारत छोडो चळवळीला आज सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. आठ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी, मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेतून इंग्रजांना भारत छोडो असा इशारा देत, भारतीयांना करा वा मरा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर नऊ ऑगस्ट १९४२ पासून देशभरात भारत छोडो चळवळ सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या चळवळीला मोठं महत्त्व आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...